Israel–Hezbollah conflict : इस्राईली (Israel) सैन्याने नुकतीच दहशतवादी गट हिजबुल्लाह (Hezbollah) विरुद्ध केलेल्या कारवाईत दक्षिण लेबनॉनमधील 29 गावे उद्ध्वस्त झाली आहे. इस्राईलने केलेल्या हवाई हल्ल्यात ही गावे मातीच्या ढिगाऱ्याखाली गेली आहेत. इस्त्राईलने येथील हिजबुल्लाहच्या ठिकाणांना लक्ष्य करून दहशतवादी गटाचे अक्षरशः कंबरडे मोडले आहे.
लेबनीज मधील एका वृत्तपत्राने आपल्या बातमीत हा दावा केला आहे. त्यात म्हटले आहे की, ‘दक्षिण लेबनॉनमधील मेस अल जबल हे गाव 4 नोव्हेंबर रोजी इस्राईली सैन्याने केलेल्या शक्तिशाली स्फोटांमध्ये नष्ट झाले आहे. इथे चारही बाजूने फक्त मातीचे ढिगारे दिसत आहेत. हिजबुल्लाह अतिरेक्यांना सीमेवरून मागे ढकलण्याच्या उद्देशाने दक्षिण लेबनॉनमधील गावांवर वारंवार हल्ले करून उद्ध्वस्त केले जात आहेत.
या वृत्तात दावा करण्यात आला आहे की, इस्रायलने सीमेवरील किमान 29 गावे पूर्णपणे उद्ध्वस्त केली आहेत. लेबनॉनच्या राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने म्हटले आहे की, इस्राईली सैन्याने केलेली ही कारवाई युद्ध नसून गुन्हा आहे. यावर इस्राईलने सांगितले आहे की, ‘सीमाभागातील दहशदवादी संघटना हिजबुल्लाहची ठिकाणे नष्ट करण्याच्या उद्धेशाने ही कारवाई करण्यात आली आहे.’
लेबनॉनच्या राष्ट्रीय वृत्तसंस्थेनुसार, लेबनॉनमध्ये मंगळवारी इस्त्राईलने केलेल्या हवाई हल्ल्यात किमान 25 लोक ठार झाले आहेत. तर 32 जण जखमी झाले आहेत. इस्राईलने माउंट लेबनॉनच्या चौफ जिल्ह्यातील बारझा येथील निवासी अपार्टमेंटला लक्ष्य केले आहे. या हल्ल्यात 15 जणांचा मृत्यू झाला होता. गावांमध्ये आणि शहरांमध्ये झालेल्या हल्ल्यांमध्ये आणखी 10 लोक जखमी झाले आहेत.