Sadabhau Khot vs Sharad Pawar : ”माझा कुणाच्याही व्यंगत्वाकडे बघून बोलण्याचा हेतू नव्हता. ही गावगाड्याची भाषा आहे, पण काही लोकांनी त्या शब्दाचा अर्थाचा विपर्यास केला. त्यामुळे कोणाच्याही भावना दुखावल्या असतील तर मी ते शब्द मागे घेतो. मी दिलगिरी व्यक्त करतो.” असे वक्तव्य भाजप नेते सदाभाऊ खोत (Sadabhau Khot) यांनी केले आहे.
नुकतेच सदाभाऊ खोत यांनी शरद पवारांवर एक विधान केले होते. खोत यांच्या वक्तव्यावरून राज्यभरातून प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. त्यांनंतर सदाभाऊ खोत यांनी आपले वक्तव्य कोणाच्याही भावना दुखावण्यासाठी नव्हते असे म्हणत आपले शब्द मागे घेतले आहेत.
शरद पवारांनी नुकतेच ‘महाराष्ट्र बदलायचा’ आहे असे वक्तव्य केले होते. त्यांच्या याच वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना सदाभाऊ खोत म्हणाले होते, “आता महाराष्ट्र बदलायचा आहे म्हणजे तूम्हाला कसला चेहरा पाहिजे?, असे सदाभाऊ खोत यांनी म्हंटले होते.
मात्र, त्यांच्या या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळातून एका मागून एक प्रतिक्रिया येऊ लागल्या. त्यानंतर खोत यांनी आपला असं म्हणण्याचा हेतू नव्हता असे म्हंटले आहे आणि पवारांची माफी मागितली आहे.
काय म्हणाले सदाभाऊ खोत ?
‘पवार साहेब, तुमच्या चिल्यापिल्याने कारखाने हाणले, बँका हाणल्या, सुतगिरण्या हाणल्या, पण पवारांना मानावं लागेल, एवढं घडलं तरी सुद्धा भाषणात म्हणतं, मला महाराष्ट्र बदलायचा आहे, मला महाराष्ट्राचा चेहरा बदलायचा आहे. कसला तुमचा चेहरा? तुमच्या चेहऱ्यासारखा पाहिजे का? तुम्हाला कसला चेहरा पाहिजे?”, असे सदाभाऊ खोत यांनी म्हंटले होते.
दरम्यान, सदभाऊंच्या या विधानावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी एक्स पोस्ट करून जाहीर नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर ही माफी आल्याचे बोलले जात आहे. तसेच मागेही सदाभाऊ खोत यांनी शरद पवार यांच्या अशाच आशयाचे विधान केले होते. त्यावरही उलट – सुलट प्रतिक्रिया उमटल्या होत्या.