Chandrasekhar Bawankule : विधासभा निवडणुका (Assembly Election) आता तोंडावर आल्या असून, सर्वच पक्षांनी प्रचाराला जोरदार सुरुवात केली आहे. याच पार्श्वभूमीवर विविध ठिकाणी प्रचार सभेचे आयोजन केले जात आहे. तसेच मंचावरून आरोप-प्रत्यारोपांची मालिका सुरु झाली आहे.
तसेच सर्वच पक्षांकडून जाहीरनामा देखील प्रसिद्ध केले जात आहे. यापूर्वी काँग्रेस व अजित पवार गटाचा जाहीरनामा प्रसिद्ध झाला होता. त्यानंतर आज उद्धव ठाकरे यांच्या पक्षाचा देखील वचननामा प्रसिद्ध करण्यात आला आहे. उद्धव ठाकरेंनी आज मातोश्रीवरुन त्यांचा जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे. त्यावरूनच आता त्यांच्यावर टीका होत आहे. भाजपने त्यांच्यावर निशाणा साधला आहे.
उद्धव ठाकरे यांनी आज शिवसेना ठाकरे गटाचा वचननामा मातोश्रीवरुन प्रसिद्ध केला आहे. यावेळी त्यांनी महिला, शेतकरी, शिक्षण आणि आरोग्याबाबत मोठ्या घोषणा केल्या आहेत.
यावरूनच प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी टीका केली आहे. बावनकुळे म्हणाले की, ‘अडीच वर्षे घरात बसून फेसबुक लाईव्ह करणाऱ्या उद्धव ठाकरे यांनी आज ‘मातोश्री‘त बसून उबाठा गटाचा वचननामा प्रसिद्ध केला आहे. अडीच वर्षे फक्त ‘माझं कुटुंब माझी जबाबदारी‘ म्हणत स्वतःच्या कुटुंबापुरते राजकारण केले. आताही घरात बसून कारभार करायची सवय सुटली नाही. हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी आतापर्यंत प्रत्येक वचननामा शिवसेना भवनात प्रकाशित केला आहे. कारण त्यांच्या डोळ्यासमोर महाराष्ट्राचे हित होते. पण उद्धव ठाकरे यांच्या डोळ्यासमोर फक्त आणि फक्त कुटुंबचं आहे. उद्धवजी नेता घरात नाही तर लोकांच्या दारात शोभून दिसतो, असा टोला चंद्रशेखर बावनकुळे यांनी यावेळी लगावला आहे.