Assembly Election 2024 : राज्यात विधानसभा निवडणुकीसाठी फक्त काहीच दिवस शिल्लक असताना राज्यात चांगलेच राजकारण रंगले आहे. तसेच बड्या नेत्यांकडून प्रचार सभांचा धडाका सुरु आहे. प्रचाराला अवघे दहा दिवसाचं शिल्लक असताना, नेते मंडळी कामाला लागले आहेत. याच पार्श्वभूमीवर आज राज्यात पक्षाच्या प्रचारासाठी पंतप्रधान मोदींच्या (Narendra Modi) दोन सभा पार पडणार आहेत. तसेच केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) देखील राज्यात चार सभेला संबोधित करणार आहेत.
महाराष्ट्रात सध्या सर्वच पक्षांनी कंबर कसली असून, राज्यात बड्या नेत्यांच्या सभांचा धुरळा उडाला आहे. राज्यात आज महायुतीतील अनेक बडे नेते आपल्या पक्षाच्या पक्षाच्या प्रचारासाठी मैदानात उतरले असून, पुण्यात देखील महायुतीच्या प्रचारासाठी अनेक दिग्गज नेत्यांनी हजेरी लावली आहेत.
महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुण्यात प्रचार सभांचे आयोजन केले आहे. पुण्यातील शिवाजीनगर मतदारसंघात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे भाजपचे उमेदवार सिद्धार्थ शिरोळे यांच्या प्रचारासाठी जाहीर सभेला संबोधित करणार आहेत.
तर उपमुख्यमंत्री अजित पवार हे वडगाव शेरी मतदारसंघाचे उमेदवार विद्यमान आमदार सुनील टिंगरे यांच्या प्रचारासाठी मेळाव्यात सहभागी होणार आहे.
दरम्यान, महायुतीतील पक्षांनी नुकताच आपला जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या जाहीरनाम्यात महिलांच्या सशक्तिकरणासाठी लाडकी बहीण योजेनचे पैसे वाढवण्याची घोषणा केली आहे. तर दुसरीकडे अजित पवारांनी 10 लाख विद्यार्थ्यांना प्रशिक्षणासाठी 10000 रुपये शिष्यवृत्ती देण्याचे आश्वासन दिले आहे. यासह आणखी मोठ्या घोषणा त्यांच्या जाहीरनाम्यात करण्यात आल्या आहेत.