Amit Shah : “मी शरद पवारांना आज आव्हान देतो, तुम्ही कितीही जोर लावा पण संभाजीनगरचे नाव छत्रपती संभाजीनगरच राहणार. जे स्वतःला बाळासाहेब ठाकरेंचे वारसदार म्हणवून घेतात, ते उद्धव ठाकरेही या नामकरणाला विरोध करत आहेत. तसेच जम्मू-काश्मीरमध्ये आम्ही कलम ३७० हटविले. संपूर्ण देशाने याला पाठिंबा दिला. मात्र उद्धव ठाकरे आणि शरद पवार याला विरोध करत आहेत. मी आज शरद पवार यांना आव्हान देतो की, तुमच्या चार पिढ्या आल्या तरी कलम 370 पुन्हा आणू शकत नाहीत.” असा हल्लाबोल केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांनी केला आहे.
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज राज्यात सभांचा धडाका सुरु आहे. एकीकडे पंतप्रधान मोदींच्या राज्यात दोन सभा होत असून, दुसरीकडे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह देखील आज चार सभांना संबोधित करत आहेत.
नुकतीच अमित शहांची सांगली जिल्ह्यातील शिराळा येथे सभा पार पडली आहे. यावेळी अमित शाह यांनी महाविकास आघाडीसह शरद पवारांवर हल्लाबोल केला आहे. शरद पवार हे दहा वर्षे सत्तेत होते या दहा वर्षात त्यांनी महाराष्ट्राला काय दिले हे सांगावे, असे देखील अमित शाह यांनी यावेळी म्हंटले आहे. तसेच यावेळी अमित शहांनी अनेक मुद्यावर भाष्य केले आहे.
दरम्यान, राज्यात 288 जागांसाठी एकाच टप्प्यात मतदान होणार असून, येत्या 20 नोव्हेंबरला महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडणार आहे. अशापरिस्थितीत प्रचारासाठी खूप कमी काळ शिल्लक असून, सर्वच पक्षांनी कंबर कसली आहे. सध्या सर्वच नेते प्रचार सभेत व्यस्त आहेत. राज्यातील निवडणुकीचे निकाल 23 नोव्हेंबरला जाहीर होणार आहेत.