Narendra Modi : महाविकास आघाडीवाले देशाला मागे खेचण्याचे काम करत आहेत. काँग्रेस आणि त्यांचे मित्र पक्ष जातीच्या आधारावर लोकांमध्ये फूट पाडत आहेत. एससी-एसटी आणि ओबीसींची प्रगती होऊ नये, अशी त्यांची इच्छा आहे. असा आरोप पंतप्रधान मोदींनी केला आहे. ते नाशिक येथे आयोजित प्रचारसभेला संबोधित करत होते.
काँग्रेसवर हल्लाबोल करत पंतप्रधान म्हणाले, “जम्मू-काश्मीरमध्ये स्वातंत्र्याच्या 75 वर्षानंतर भाजपाच्या नेतृत्वाखाली आमच्या सरकारने कलम 370 हटवून भारताचं संविधान लागू केले आहे. तेथील दलित, वंचितांम त्यांचा हक्क मिळवून दिला आहे. मात्र, काँग्रेस आणि त्यांच्या मित्र पक्षांना हे सहन होत नाहीये. विधानसभेत सत्ता येताच काँग्रेस व त्यांच्या मित्र पक्षांनी पुन्हा तेथे कलम 370 लागू करण्याचा प्रस्ताव मंजूर केला आहे. काश्मीरमध्ये संविधानाला पायदळी तुडवायचे आणि इकडे महाराष्ट्रात येवून संविधानाचा जप करत लोकांमध्ये धूळफेक करायची, अशी दुहेरी निती काँग्रेसवाल्यांनी चालविली आहे. असा घणाघात मोदींनी यावेळी केला आहे.
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज राज्यात प्रचार सभांचा धडाका सुरु आहे. आज पंतप्रधानांच्या दोन प्रचार सभा पार पडल्या आहेत, पहिली सभा धुळ्यात पार पडली असून, दुसरी सभा नाशिक येथे पार पडली आहे. नाशिक येथे बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुद्द्यांवर भाष्य केले आहे. तसेच महाराष्ट्रात राबवण्यात येत असणाऱ्या योजनांवर देखील भाष्य केले आहे. यावेळी बोलताना प्रधानमंत्री म्हणाले, “महाराष्ट्रात उज्ज्वला गॅस योजनेअंतर्गत 5 लाखांहून अधिक महिलांना मोफत गॅस कनेक्शन देण्यात आले आहे. तसेच जल जीवन अभियानांतर्गत राज्यातील 1.25 कोटींहून अधिक कुटुंबांना नळाच्या पाण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. 7 कोटी गरीब लोकांना दर महिन्याला मोफत रेशन मिळत आहे, 26 लाखांहून अधिक लोकांना पीएम आवास योजनेचा फायदा झाला आहे, त्यांना स्वतःचं घर सरकारकडून देण्यात आले आहे. त्यामुळे महाराष्ट्रात पुन्हा महायुतीचे सरकार येणे आवश्यक आहे.” असं पंतप्रधान यांनी यावेळी म्हंटले आहे.