Jammu Kashmir Assembly : जम्मू-काश्मीर विधानसभेत आज पुन्हा एकदा कलम 370 बहाल करण्यावरून गदारोळ पाहायला मिळाला आहे. अधिवेशनाच्या पाचव्या दिवशी कुपवाडा येथील पीडीपी आमदाराने कलम 370 पुन्हा लागू करण्याचा बॅनर दाखवल्यानंतर विधानसभेत हा गदारोळ झाला आहे. आज पुन्हा आमदारांमध्ये बाचाबाची झाल्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
यावेळी भाजप आमदारांकडून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली होती. इंजीनियर रशीद यांचे भाऊ आणि अवामी इत्तेहाद पक्षाचे आमदार खुर्शीद अहमद शेख यांना सभागृहाबाहेर काढण्यात आले आहे. विधानसभेत पीडीपीच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली तेव्हा ही कारवाई करण्यात आली आहे. याआधी गुरुवारीही विधानसभेत चांगलाच गदारोळ झाला होता. यावेळी आमदारांमध्ये हाणामारी झाल्याची घटना समोर आली होती.
त्याचवेळी जम्मू-काश्मीर विधानसभेचे अध्यक्ष अब्दुल रहीम राथेर यांच्या आदेशावरून सभागृहाच्या वेलमध्ये (अध्यक्षांच्या समोरील जागा) घुसलेल्या भाजप आमदारांना हाकलून लावले.
#WATCH | Srinagar | By orders of the J&K Assembly Speaker Abdul Rahim Rather, BJP MLAs entering the well of the House marshalled out pic.twitter.com/yHbRS1VEsw
— ANI (@ANI) November 8, 2024
पीडीपी आणि पीपल्स कॉन्फरन्ससह (पीसी) आमदारांच्या गटाने गुरुवारी विधानसभेत नवीन ठराव मांडला आहे. यामध्ये कलम 370 आणि 35-A पुन्हा लागू करण्याची मागणी करण्यात आली आहे. विधानसभेने आता हा ठराव मंजूर केला आहे.
या ठरावात म्हटले आहे की, ‘हे सभागृह जम्मू आणि काश्मीर पुनर्रचना कायदा, 2019 लागू करून केंद्र सरकारने कलम 370 आणि कलम 35-A च्या असंवैधानिक आणि एकतर्फी रद्द केल्याचा तीव्र निषेध करते. या कृतींमुळे जम्मू-काश्मीरचा विशेष दर्जा आणि राज्याचा दर्जा काढून घेण्यात आला आहे. यामुळे राज्यघटनेने या प्रदेशाला आणि तेथील लोकांना मूळत: दिलेली मूलभूत हमी आणि संरक्षणे कमी केली आहेत.
दरम्यान त्याचवेळी, बुधवारी विधानसभेने जम्मू-काश्मीरचा विशेष दर्जा बहाल करणारा प्रस्ताव मंजूर केला आहे. खोऱ्यातील राजकीय पक्षांनी या प्रस्तावाचे स्वागत केले, तर प्रमुख विरोधी पक्ष भाजपने याला तीव्र विरोध दर्शवला आहे.