Dhananjaya Y. Chandrachud : भारताचे सरन्यायाधीश न्यायमूर्ती डी.वाय. चंद्रचूड (Dhananjaya Y. Chandrachud) यांना रविवारी पदावरून मुक्त करण्यात येणार आहे. मात्र, शनिवार व रविवार, न्यायालयीन सुट्टी असल्यामुळे शुक्रवारी त्यांच्यासाठी निरोप समारंभाचे आयोजन करण्यात आले होते.
आता चंद्रचूड यांच्या जागी न्यायमूर्ती संजीव खन्ना यांची निवड करण्यात आली आहे. संजीव खन्ना हे देशाचे 51 वे सरन्यायाधीश असणार आहेत, जस्टिस चंद्रचूड यांनी 9 नोव्हेंबर 2022 रोजी भारताचे 50 वे सरन्यायाधीश म्हणून शपथ घेतली होती. 13 मे 2016 रोजी त्यांची अलाहाबाद उच्च न्यायालयातून नियुक्ती करण्यात आली होती.
निरोप समारंभात काय म्हणाले न्यायमूर्ती डी.वाय. चंद्रचूड?
निरोप समारंभाच्या कार्यक्रमाला संबोधित करताना न्यायमूर्ती चंद्रचूड भावुक झालेले दिसले. यावेळी ते म्हणाले, , ‘रात्री मी विचार करत होतो की दुपारी 2 वाजता कोर्ट रिकामे होईल आणि मी स्क्रीनवर स्वतःला पाहत आहे. तुम्हा सर्वांच्या उपस्थितीने मी भारावून गेलो आहे. मी लहान असताना सर्वोच्च न्यायालयात यायचो आणि इथली कार्यवाही आणि कोर्टात दाखवलेली दोन छायाचित्रे पाहायचो. न्यायमूर्ती छागला यांचा मुंबई उच्च न्यायालयातही मोठा प्रभाव होता.’
ते पुढे म्हणाले, ‘आम्ही सगळे इथल्या प्रवाशांसारखे आहोत, जे काही वेळासाठी येतात, आपलं काम करतात आणि मग जातात. न्यायालयाच्या रूपाने ही संस्था कायम सुरू राहील आणि विविध विचारांचे लोक तिच्याकडे येतच राहतील. माझ्यानंतर न्यायमूर्ती खन्ना या संस्थेला ताकदीने आणि सन्मानाने पुढे नेतील, असा मला पूर्ण विश्वास आहे.
न्यायमूर्ती जेबी पारडीवाला आणि न्यायमूर्ती मनोज मिश्रा यांच्यासोबत बसून काम करण्याचा अनुभव कायम आठवत राहील, असेही चंद्रचूड यांनी म्हटले आहे. ते पुढे म्हणाले, ‘हेच न्यायालय मला पुढे जाण्याची प्रेरणा देते. आम्ही अशा लोकांना भेटतो ज्यांना आम्ही ओळखत नाही आणि हे अनुभव जीवनाकडे एक नवीन दृष्टीकोन देतात.’
‘माझ्यामुळे कोणाला काही त्रास झाला असेल तर मला माफ करा…’
चंद्रचूड पुढे म्हणाले, ‘मी आज खूप काही शिकलो आहे. कोणतीही केस सारखी नसते. कोर्टात माझ्यामुळे कोणाला काही त्रास झाला असेल तर मी नम्रपणे माफी मागतो. शेवटी आभार मानताना न्यायमूर्ती चंद्रचूड म्हणाले, ‘तुम्हा सर्वांचे मनःपूर्वक आभार, तुम्ही इतक्या मोठ्या संख्येने येथे आलात. यासाठी मी सदैव ऋणी राहीन. असेही चंद्रचूड यांनी यावेळी म्हंटले आहे.