BJP : भाजपला नवा अध्यक्ष कधी मिळणार? याबाबत राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे. परंतु आता ताज्या घडामोडींवरून असे दिसून येते आहे की, भारतीय जनता पक्ष येत्या काही महिन्यांत आपला नवा राष्ट्रीय अध्यक्ष निवडू शकतो. या महिन्यात पक्षाने सर्व राष्ट्रीय अधिकारी आणि प्रदेशाध्यक्षांची बैठक बोलावली आहे.
महाराष्ट्र आणि झारखंडमधील विधानसभा निवडणुका संपल्यानंतर भाजप अध्यक्ष निवडीची प्रक्रिया वेगवान केली जाईल. पक्षाने 22 नोव्हेंबर रोजी सर्व राष्ट्रीय अधिकारी आणि राज्य अधिकाऱ्यांसह सुमारे 125 लोकांची बैठक बोलावली आहे. या बैठकीला भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह देखील उपस्थित राहणार आहेत.
या बैठकीला संघटनेचे राष्ट्रीय निवडणूक अधिकारी के लक्ष्मण आणि संघटनेत अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी नियुक्त केलेले तीन सह- निवडणुक अधिकारी आणि राज्यांमध्ये नियुक्त केलेले राज्य निवडणूक अधिकारी, सह- अधिकारी ही उपस्थित राहतील.
दरम्यान निवडणुकीसाठी भाजपा संघटनेचे केंद्रीय निवडणूक अधिकारी के लक्ष्मण यांनी राष्ट्रीय अपील समितीची स्थापना केली आहे. भाजपाच्या (BJP) अध्यक्षपदाच्या निवडणूकीत गैरप्रकार होऊ नये यासाठी ही अपील समिती काम करणार आहे.
22 नोव्हेंबर रोजी होणाऱ्या बैठकीत भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्ष निवडीच्या प्रक्रियेला गती देण्याची तयारी केली जाऊ शकते. जानेवारीमध्ये भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाच्या निवडणूक प्रक्रियेची पूर्ण तयारी केली जाणार असून 15 जानेवारीनंतर पक्षाला नवा अध्यक्ष मिळू शकतो, असे बोलले जात आहे.