Amit Shah : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत (Maharashtra Assembly elections 2024) सत्ताधारी युती भाजप (भाजप), शिवसेना (शिवसेना) आणि अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) एकत्र लढत आहेत. राज्यात महायुतीची सत्ता पुन्हा आल्यास पुढचा मुख्यमंत्री कोण असेल, याचे संकेत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांनी नुकत्याच पार पडलेल्या एक सभेत दिले होते.
सांगली जिल्ह्यातील शिराळा येथील प्रचार सभेला संबोधित करताना शहा म्हणाले होते की, ‘राज्यात सर्वत्र महायुतीचे सरकार आणून देवेंद्र फडणवीस यांना विजयी करायचे आहे.’ अमित शहांनी केलेल्या या विधानानंतर महायुती जर सत्तेत आली तर मुख्यमंत्री हे देवेंद्र फडणवीसच असतील अशी चर्चा सुरु झाली आहे.
सध्या महायुतीचे नेतृत्व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे आहे. अशातच महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीनंतर महायुतीच्या मुख्यमंत्रीपदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार, याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.
दरम्यान, नुकत्याच केलेल्या एका विधानात अमित शहांनी पुन्हा एक गुगली टाकली आहे. महायुती सरकार पूर्ण बहुमताने राज्यात विराजमान होणार असून मुख्यमंत्रीपदाचा निर्णय निवडणुकीनंतर जाहीर करू, असे अमित शहा यांनी म्हंटले आहे.
भाजपच्या निवडणूक जाहीरनाम्याच्या प्रकाशनानंतर पत्रकारांशी बोलताना अमित शहा म्हणाले की, ‘ही विधानसभा महायुती जिंकणार आहे. निवडणुकीनंतर तीन पक्षांच्या मंत्र्यांची एक समिती बनवली जाईल. सध्या एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री आहेत. निवडणुकीनंतर महायुतीतील घटक पक्ष मुख्यमंत्रीपदाच्या उमेदवाराचा निर्णय घेतील. असे अमित शहांनी यावेळी स्पष्ट केले आहे.