Wayanad Bye Elections : महाराष्ट्र आणि झारखंड विधानसभा निवडणुकांच्या (Assembly Election 2024) घोषणेसोबतच निवडणूक आयोगाने पोटनिवडणुकाही जाहीर केल्या आहेत. दरम्यान, केरळच्या वायनाड लोकसभा जागेसाठी पोटनिवडणूक जाहीर करण्यात आली आहे. यासाठी 13 नोव्हेंबरला मतदान होणार असून 23 तारखेला निकाल लागणार आहे. ही लोकसभा जागा राहुल गांधींच्या राजीनाम्यानंतर रिक्त झाली होती. विधानसभेसाठी 20 नोव्हेंबरला मतदान होणार आहे.
लोकसभा निवडणुकीत काँग्रेस नेते राहुल गांधी वायनाड आणि रायबरेली मतदारसंघातून विजयी झाले होते. गांधींनी वायनाडची जागा सोडली होती आणि रायबरेलीची जागा राखली होती. राहुल गांधी यांची बहीण आणि काँग्रेस सरचिटणीस प्रियांका गांधी वड्रा या जागेवरून पक्षाच्या उमेदवार असतील.
पलक्कड पोटनिवडणुकीची तारीख बदलली
निवडणूक आयोगाने सोमवारी केरळमधील पलक्कड मतदारसंघातील विधानसभा पोटनिवडणुकीची तारीख 13 नोव्हेंबर बदलून 20 नोव्हेंबर केली आहे. अधिकृत निवेदनात ही माहिती देण्यात आली आहे. केरळमधील पलक्कड विधानसभेच्या जागेव्यतिरिक्त, उर्वरित चेलाक्करा विधानसभा आणि वायनाड लोकसभा जागांसाठी पोटनिवडणूक पूर्वनिर्धारित तारखेला म्हणजेच 13 नोव्हेंबर रोजी होणार आहे.
तारीख का बदलली?
केरळच्या पलक्कड विधानसभा मतदारसंघात 13 ते 15 नोव्हेंबर या कालावधीत मोठ्या संख्येने मतदार कल्पती रथोत्सवम उत्सव साजरा करतील, असे काँग्रेसने म्हंटले होते. याशिवाय केरळमधील सत्ताधारी लेफ्ट डेमोक्रॅटिक फ्रंट (LDF) आणि विरोधी युनायटेड डेमोक्रॅटिक फ्रंट (UDF) यांनीही पलक्कड विधानसभा मतदारसंघासाठी जाहीर झालेल्या पोटनिवडणुकीची तारीख बदलण्याची मागणी निवडणूक आयोगाकडे केली होती. त्यानंतर ही तारीख बदलण्यात आली आहे.