Eknath Shinde : राज्यात विधानसभा निवडणुका (Assembly elections 2024) तोंडावर आल्या असून, आरोप-प्रत्यारोपाची मालिका सुरु आहे. दरम्यान, निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांनी आपला जाहीरनामा प्रसिद्ध केला असून, नुकतेच महायुतीने आपले ‘संकल्प पत्र’ जाहीर केले आहे. तसेच महाविकास आघाडीने देखील आपला ‘महाराष्ट्रनामा’ जाहीर केला आहे.
दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वैजापूर विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार रमेश बोरणारे यांच्या प्रचार सभेत बोलताना महाविकास आघाडीवर जोरदार हल्लाबोल करत महाविकास आघाडीवर गंभीर आरोप केले आहेत.
या सभेत बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले, ‘महायुतीने प्रकाशित केलेला जाहीरनामा फक्त ट्रेलर असून पिक्चर अजून बाकी आहे, असं म्हणत आगामी काळात आणखी मोठ्या योजना आणणार असल्याचे संकेत दिले आहेत. यावेळी त्यांनी महाविकास आघाडीने महायुतीचा जाहीरनामा चोरल्याचा आरोपही केला आहे.
दरम्यान, राज्यात 288 जागांसाठी एकाच टप्प्यात मतदान होणार असून, येत्या 20 नोव्हेंबरला महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडणार आहे. तर 23 नोव्हेंबरला निकाल जाहीर होणार आहेत. निवडणुका आता तोंडावर आल्याने सर्वच पक्ष सध्या प्रचाराच्या कामाला लागले आहेत. विविध ठिकाणी सध्या मोठ्या प्रमाणात प्रचार सभांचे आयोजन करण्यात येत आहे.