Maharashtra Assembly Elections : झारखंडमध्ये 13 नोव्हेंबरला विधानसभा निवडणुकीसाठी (Assembly Elections) मतदान होणार आहे. याच्या एक दिवस आधी म्हणजेच आज ईडीने झारखंडची राजधानी रांची आणि पश्चिम बंगालच्या इतर जिल्ह्यांसह झारखंडमध्ये 17 ठिकाणी छापे टाकले आहेत. ईडीची टीम राजधानी रांचीमध्ये सहा ठिकाणी छापे टाकत आहे. झारखंड आणि पश्चिम बंगालमधील इतर जिल्ह्यांमध्येही ईडीची कारवाई सुरू आहे. ईडीचे पथक सकाळपासून हॉटेल स्कायलाइन आणि अश्विन डायग्नोसिस सेंटर आणि राजधानी रांचीमधील इतर ठिकाणी छापे टाकत आहेत.
कोणत्या प्रकरणात ईडीचे पथक छापे टाकत आहे?
मिळालेल्या माहितीनुसार, बांगलादेशी मुलींना राजधानी रांचीच्या बरियातू पोलीस स्टेशन परिसरातून पकडण्यात आले आहे. त्यांच्या चौकशीदरम्यान त्या बांगलादेशातून रांचीत आल्याची माहिती मिळाली आहे. यानंतर बरियातू पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच, 16 सप्टेंबर रोजी ईडीने झारखंडमध्ये बांगलादेशी मुलींची तस्करी आणि संशयित घुसखोरीच्या प्रकरणाचा तपास करण्यासाठी मनी लाँड्रिंगचा गुन्हा दाखल केला होता. याप्रकरणी ईडीची छापेमारी सुरू आहे.
बांगलादेशातून भारतात घुसखोरीचा प्रयत्न
ईडीने अद्याप अधिकृतपणे काहीही सांगितलेले नाही. मात्र, बनावट कागदपत्रांच्या सहाय्याने बांगलादेशातील मुलींना ३१ मे रोजी कोलकातामार्गे रांची येथे आणण्यात आले आहे. यामध्ये कोलकाता येथील एका एजंटचे नावही समोर आले आहे. अशा परिस्थितीत बांगलादेशातून भारतात होणारी घुसखोरी आणि अशा कारवायांचा तपास करण्यासाठी ईडीने ही कारवाई सुरु केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, रांची, पाकूर आणि पश्चिम बंगालमध्ये हे छापे सुरू आहेत. ईडीच्या या कारवाईचा संपूर्ण तपशील अद्याप समोर आलेला नाही.