खलिस्तानी दहशतवादी अर्शदीप ऊर्फ अर्श डल्ला ( Arsh Dalla ) याला रविवारी कॅनडामध्ये अटक करण्यात आली असल्याचे वृत्त समोर आले आहे. अर्श डल्ला हा निज्जरचा निकटवर्तीय असल्याचे सांगितले जाते.खलिस्तानी दहशतवादी हरदीपसिंग निज्जर याची अज्ञात हल्लेखोरांनी गोळ्या झाडून हत्या केली होती.
जानेवारी 2023 मध्ये केंद्रीय गृह मंत्रालयाने त्याला बेकायदेशीर क्रियाकलाप (प्रतिबंध) कायद्याअंतर्गत “दहशतवादी” घोषित केले होते. तो देशातील मोस्ट वाँटेड दहशतवाद्यांपैकी एक असून त्याच्यावर त्याच्यावर लक्ष्यित हत्या आणि खंडणीच्या विविध प्रकरणांमध्ये आरोप ठेवण्यात आले आहेत.तसेच त्याच्यावर दहशतवादी वित्तपुरवठा, सीमापार ड्रग्ज आणि शस्त्रास्त्रांची मोठ्या प्रमाणावर तस्करी केल्याचेही गंभीर आरोप आहेत.
सीटीव्हीवरील एड्रियन घोब्रिअल यांनी दिलेल्या वृत्तानुसार, ऑन्टारियोमध्ये 28 ऑक्टोबर रोजी झालेल्या गोळीबाराशी संबंधित प्रकरणात डल्लावर आरोप ठेवण्यात आले आहेत.तसेच त्याला आज स्थानिक न्यायालयात हजर केले जाणार असल्याची माहिती समोर आली आहे.
डल्ला 2018 मध्ये पंजाबमधून कॅनडामध्ये आला होता आणि कॅनडाच्या ग्लोब अँड मेल वृत्तपत्रातील अहवालानुसार डल्ला लखबीर टोळीचा प्रमुख असून तो सरे येथे आपल्या पत्नीसह वास्तव्यास होता. तसेच हरदीपसिंग निज्जरच्या हत्येनंतर तोच दहशवादी कारवाया आणि पंजाबमध्ये गुन्हेगारी कारवाया घडवत असल्याची माहिती समोर आली आहे
तसेच 10 नोव्हेंबर रोजी पंजाब पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांनी डल्लाच्या दोन प्रमुख नेमबाजांना गेल्या महिन्यात राज्यातील फरीदकोट जिल्ह्यात शीख कार्यकर्ते गुरप्रीत सिंग हरी नऊ यांच्या हत्येप्रकरणी कथित सहभागासाठी अटक केली आहे.
मात्र डल्लाच्या कोठडीबाबत कॅनेडियन पोलिसांकडून कोणतेही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. कॅनडा आणि भारत यांच्यातील राजनैतिक चर्चा सध्या ठप्प झालेल्या असून अशा परिस्थितीत दोन्ही देशांमध्ये माहितीची देवाणघेवाण बंद आहे.