Jharkhand Assembly Election : झारखंड विधानसभा निवडणुकीत काल बुधवारी पहिल्या टप्प्यात एकूण 43 जागांवर मतदान पार पडले. याठिकाणी संध्याकाळपर्यंत 64.86 टक्के मतदानाची नोंद करण्यात आली. पहिल्या टप्प्यातील मतदानानंतर एकूण 683 उमेदवारांचे भवितव्य ईव्हीएममध्ये बंद झाले आहे.विशेष म्हणजे यावेळी पहिल्यांदाच रांची जिल्ह्यातील तमाडच्या अरहंगा येथे मतदान केंद्र बनवले होते. तिथे लोकांनी पहिल्यांदाच न घाबरता मतदान केले. पूर्वी हा भाग नक्षलग्रस्त होता. त्यामुळे लोक उघडपणे मतदानाला येण्यास घाबरत असत. सततच्या नक्षलविरोधी मोहिमेमुळे या परिसरात नक्षलवादाचा प्रभाव नगण्य झालेला बघायला मिळाला. ज्यामुळे मतदानाची टक्केवारी वाढलेली दिसून आली.
राज्याच्या शहरी भागातील मतदारांमध्ये यंदाही उदासीनता दिसून आली. रांचीमध्ये सर्वात कमी मतदान झाले, तर जमशेदपूर पूर्व, जमशेदपूर पश्चिम, हटिया, कानके हजारीबाग येथील मतदारही उदासिन राहिले. यंदाच्या निवडणुकीत रांची येथे 51.50 टक्के मतदान झाले. कणके वगळता इतर शहरी भागातही मतदानाच्या टक्केवारीत अंशत: सुधारणा झाली.लोहरडगा जिल्ह्यात सर्वाधिक ७३.२१ टक्के तर हजारीबाग जिल्ह्यात सर्वात कमी ५९.१३ टक्के मतदान झाले.झारखंडमध्ये पहिल्यांदाच 43 जागांसाठी एकाच वेळी मतदान झाले. काही तुरळक घटना वगळता मतदान पूर्णपणे शांततेत पार पडले.
राज्यातील बहुतांश मतदान केंद्रांवर नियोजित वेळेनुसार सकाळी 7 वाजता मतदानाला सुरुवात झाली. काही केंद्रांवर ईव्हीएम आणि व्हीव्हीपीएटीमध्ये बिघाड झाल्याच्या तक्रारी होत्या, जिथे त्यांची वेळेवर दुरुस्ती करण्यात आली किंवा ती बदलून मतदान सुरू झाले. पहिल्या टप्प्यात ज्या 43 जागांवर मतदान झाले. एकूण 15,344 मतदान केंद्रांपैकी 950 मतदान केंद्रांवर दुपारी 4 वाजेपर्यंत आणि उर्वरित सर्व मतदान केंद्रांवर सायंकाळी 5 वाजेपर्यंत मतदान झाले.
कोडरमा, बरकाथा, बार्ही, हजारीबाग, जमशेदपूर पूर्व, जमशेदपूर पश्चिम, माझगाव, रांची, हटिया, पंकी आणि भवनाथपूर येथील मतदान केंद्रांवर सायंकाळी 5 वाजेपर्यंत मतदान पार पडले. झारखंडमध्ये सत्ताधारी झारखंड मुक्ती मोर्चाच्या नेतृत्वाखालील आघाडीविरोधात भाजपची राष्ट्रीय लोकशाही आघाडी असा थेट सामना आहे.