उत्तरप्रदेशच्या 5 संवेदनशील जिल्ह्यांमध्ये दहशतवादविरोधी पथक(ATS) वाढवण्याची तयारी सुरू आहे.सध्या, उत्तर प्रदेशमध्ये 18 एटीएस युनिट्स कार्यरत आहेत, ज्यात लखनौमधील मुख्यालय आणि स्पॉट प्रशिक्षण केंद्राचा समावेश आहे. पिलीभीत, मिर्झापूर, खेरी, सिद्धार्थनगर आणि मुरादाबाद येथे नवीन युनिट्सची स्थापना केली जाणार आहे. संवेदनशील असलेला नेपाळ बॉर्डरचा भाग आणि अतिरेकी कारवायांसाठी असुरक्षित असलेल्या प्रदेशांच्या सान्निध्यामुळे या भागांना संवेदनशील ठिकाणे म्हणून ओळखले जाते.
राज्य सरकारने 2 वर्षांपूर्वी 12 जिल्ह्यांमध्ये एटीएस कमांडो केंद्रे निर्माण करण्याची घोषणा केली होती, त्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. श्रावस्ती, बहराइच, मेरठ, अलीगढ, ग्रेटर नोएडा (जेवार विमानतळ), आझमगड (विमानतळाच्या जवळ), कानपूर, मिर्झापूर, सोनभद्र आणि देवबंद येथे एटीएस कमांडो प्रशिक्षण केंद्रे स्थापन केली जात आहेत. याशिवाय वाराणसी आणि झाशी येथे एटीएसच्या तुकड्या तैनात करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.सध्या राज्यात एटीएसच्या 18 युनिट कार्यरत आहेत, ज्यामध्ये सहारनपूरच्या देवबंद युनीटची नुकतीच स्थापना करण्यात आली आहे.
एटीएसचा विस्तार करण्यासाठी राज्य सरकार अनेक जिल्ह्यांमध्ये कमांडो सेंटरसह युनिट सुरू करणार आहे. याद्वारे दहशतवादी संघटना, त्यांचे स्लीपर सेल आणि कट्टरतावादी विचारसरणीच्या लोकांवर बारीक नजर ठेवता येईल. तसेच जोखमीच्या कारवायांसाठी अत्याधुनिक शस्त्रे आणि उपकरणे खरेदी करण्याचा प्रस्तावही सरकारकडे पाठवण्यात आला आहे. ज्यामध्ये रडार सिस्टीम, स्नायपर रायफल, पंप-ॲक्शन शॉटगन, नाईट-व्हिजन ड्रोन कॅमेरे, नाईट वेपन साइट्स आणि थर्मल इमेजिंग स्नायपर साइट्स इत्यादी सामग्रीचा समावेश असेल.