शिवसेनेचे संस्थापक बाळासाहेब ठाकरे यांचे औरंगाबादचे नामकरण छत्रपती संभाजीनगर करण्याचे स्वप्न होते, आणि आम्ही ते प्रत्यक्षात आणले , असे पंतप्रधान मोदी म्हणाले आहेत. छत्रपती संभाजीनगरमधील सभेत ते बोलत होते. तसेच काँग्रेस पक्षाचा विकासावर विश्वास नसून सरकार स्थापनेसाठी विभाजनावर विश्वास असल्याचे मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केले. आजकाल इंटरनेटवर व्हायरल होणाऱ्या जुन्या जाहिराती आरक्षणाबाबत काँग्रेसची खरी विचारसरणी दर्शवतात.सर्वांनी एक राहा अन्यथा काँग्रेस आरक्षण समाप्त करेल, असा इशाराही त्यांनी या सभेत दिला आहे .
एनडीए आघाडीच्या उमेदवारांच्या समर्थनार्थ प्रचार सभेला संबोधित करताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, काँग्रेस पक्षाने नेहमीच विभाजनाला महत्त्व दिले आहे. कारण लोकांमध्ये फूट पडली की काँग्रेसला फायदा होतो. काँग्रेस पक्षाने देशात आरक्षणाला नेहमीच विरोध केला आहे. त्यांचे नेते परदेशात जाऊन आरक्षण संपवण्याच्या बोलतात. काँग्रेसची मानसिकता आणि अजेंडा आजही तोच आहे. त्यामुळे गेली 10 वर्षे त्यांना ओबीसीचा पंतप्रधान सहन करणे कठीण झाले आहे.
पंतप्रधान पुढे म्हणाले की, औरंगाबादचे नाव बदलून छत्रपती संभाजीनगर करण्याचे स्वप्न शिवसेनेचे संस्थापक बाळासाहेब ठाकरे यांनी पाहिले होते. त्यांचा मुलगा मुख्यमंत्री झाला , पण त्यांनी ते स्वप्न पूर्ण केले नाही. राज्यात एनडीए आघाडीचे सरकार आल्यावर हा प्रस्ताव केंद्राकडे पाठवून औरंगाबादचे नाव बदलून छत्रपती संभाजीनगर करण्याची शिवसेना संस्थापक बाळासाहेब ठाकरे यांची इच्छा आम्ही पूर्ण केली. एकीकडे आम्ही छत्रपती संभाजी महाराजांचे समर्थक आहोत तर दुसऱ्या बाजूला त्यांची हत्या करणाऱ्याचे समर्थक आहेत. त्यामुळे छत्रपती संभाजी महाराजांच्या मारेकऱ्यांच्या समर्थकांना विधानसभा निवडणुकीत त्यांची जागा दाखवून देण्याची गरज आहे.
पंतप्रधान मोदी यांनी यावेळी महायुती सरकारच्या कामांचे कौतुक केले. या विकासकामाचा महायुती आणि मराठवाड्याला फायदा होणार असल्याचे पंतप्रधान म्हणाले आहेत. महाराष्ट्राला विकसित भारताच्या व्हिजनचे नेतृत्त्व करायचे आहे. भाजपा आणि महायुती त्याच दिशेने काम करत आहे. समृद्धी महामार्ग संभाजीनगर जिल्ह्यातून जातो. मराठवाडा, विदर्भ मुंबईशी थेट जोडला आहे. आता जळगाव, धुळे, सोलापूरशी महामार्ग कनेक्ट करण्याचं काम सुरु आहे. या संपूर्ण क्षेत्रात रेल्वेचं आधुनिक करण्याचं काम केले जात आहे.
महायुती सरकार सत्तेवर आल्यानंतर देशात सर्वाधिक परदेशी गुंतवणूक महाराष्ट्रात झाली आहे. त्याचा फायदा असा की आगामी काळात अनेक मोठ्या कंपन्या आपल्याकडे काम आणणार आहेत. त्यासाठी राज्यातील मोठा इंडस्ट्रीयल पार्क होत आहे. जास्त गुंतवणूक, जास्त कंपन्या म्हणजे संभाजीनगर आणि मराठवाड्यातील तरुणांना जास्तीत जास्त रोजगार, असे समीकरण मोदींनी यावेळी सांगितले आहे.