Varanasi : आज 15 नोव्हेंबर रोजी कार्तिक पौर्णिमेला देशभरात देव दिवाळीचा सण साजरा केला जाणार आहे. काशी या धार्मिक नगरीत देवदीपावलीचा सण हा अतिशय भव्य आणि दिव्य पद्धतीने साजरा केला जातो. पौराणिक कथेनुसार, दिवाळीच्या दिवशी, स्वर्गातील सर्व देवता दिवाळीचा सण साजरा करण्यासाठी भगवान शिवासोबत त्यांच्या नगर काशीमध्ये येतात. कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी देवता गंगेच्या तीरावर दिवे लावून भगवान शंकराची पूजा करतात आणि काशीमध्ये निवास करतात. अशी समजूत आहे. आज काशीमध्ये साजऱ्या होणाऱ्या या देव दिवाळीच्या सणाची मोठ्या प्रमाणावर तयारी सुरू आहे. काशीच्या 84 हून अधिक घाटांवर, सर्व मठ, मंदिरांसह तलाव आणि घरांमध्ये दिवे लावण्याची तयारी सुरू आहे. संपूर्ण काशी शहर सुमारे 20 लाख दिव्यांनी उजळून निघणार आहे.
देव दिवाळीनिमित्त काशीतील गंगा तीरावर लाखो दिवे प्रज्वलित करण्यात येणार आहेत. त्यामुळे हा अलौकिक देखावा अधिक दिव्य आणि भव्य बनवण्यासाठी उत्तर प्रदेश सरकारने काशीच्या ललिता घाट आणि चेतसिंह किल्ल्यावर लेझर शो आयोजित केला आहे. लेझर शोच्या माध्यमातून शिवपुराणाचे सादरीकरण भाविकांना पाहता येणार आहेत. तसेच गंगा मातेची विशेष आरती होणार आहे. गंगा सेवा निधीचे अध्यक्ष सुशांत मिश्रा यांनी दिलेल्या माहितीनुसार, दशाश्वमेध घाटावर 21 अर्चक आणि देव कन्या रिद्धी-सिद्धीच्या रूपात माता गंगेची विशेष आरती करतील. आरतीनंतर पर्यटन विभाग आणि जिल्हा प्रशासनाच्या वतीने गंगा पलीकडे वाळूवर पर्यावरणपूरक भव्य फटाक्यांची आतषबाजी करण्यात येणार आहे. याशिवाय नमो घाटावर सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे. वाराणसीचे जिल्हा दंडाधिकारी एस. राज लिंगम यांनी दिलेल्या माहितीनुसार, गंगेच्या काठावर दिव्यांची रोषणाई, लेझर शो आणि फटाक्यांच्या आतषबाजीसह सांस्कृतिक कार्यक्रमाची तयारी पूर्ण झाली आहे.उपराष्ट्रपती जगदीप धनखड , राज्यपाल आनंदीबेन पटेल, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री हरदीप सिंग पुरी हे देखील या क्षणाचे साक्षीदार असतील.
नमोघाटाचे उद्घाटन केल्यानंतर, उपराष्ट्रपती धनखड हे मुख्यमंत्री योगी यांच्यासमवेत गंगा नदीच्या मध्यावरून देव दिवाळीचे विहंगम दृश्य पाहण्यासाठी एका विशेष क्रूझवर जातील. त्यानंतर या क्रूझमधूनच, विशेष पाहुणे चेतसिंग घाटावरील लेझर शो आणि गंगेच्या पलीकडेदिसणाऱ्या फटाक्यांचा आतषबाजीचा आनंद घेणार आलेत. या कालावधीत गंगा नदीच्या परिसरात अभेद्य सुरक्षा तटबंदी बांधण्यात आली आहे. क्रूझच्या आसपास जल पोलीस आणि रुग्णवाहिका तैनात करण्यात येणार आहे. व्हीव्हीआयपी लोकांची उपस्थिती लक्षात घेता गंगा नदीतही कडेकोट सुरक्षा व्यवस्था करण्यात आली आहे. नमो घाटापासून ते समणे घाटापर्यंत गंगा नदीचे नऊ भागांमध्ये विभाजन करण्यात आले आहे. सकाळपासून 68 मोटरबोटवर 444 सैनिक गंगा नदीवर गस्त घालत आहेत. याशिवाय 11 NDRF वॉटर ॲम्ब्युलन्स आणि 20 मोटार बोटींमध्ये गंगा नदीत प्रथमोपचार सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.
Dev Deepawali in Varanasi is on 15th November. Experience the awe-inspiring sight of thousands of diyas illuminating the ghats and reflecting on the Ganges. Plan your visit now to immerse yourself in this unique spiritual celebration. 🪔🌕
VC: @ hi.prayagraj (IG)
Click on the… pic.twitter.com/qM04JuQSK3
— Incredible!ndia (@incredibleindia) November 11, 2024
पोलिस आयुक्त मोहित अग्रवाल यांनी ड्युटीवर असलेल्या पोलिसांना अधिक सतर्क राहण्यास सांगितले आहे. या सणाच्या निमित्ताने गंगेत आज मासेमारी आणि पॅडल बोटीही धावणार नाहीत. सुरक्षा व्यवस्थेच्या दृष्टीने गंगेच्या मध्यभागी फ्लोटिंग डिव्हायडर बसवण्यात आले आहे.
दरवर्षी देव दिवाळीला लोक दुपारपासूनच गंगेच्या काठावर पोहोचायला सुरुवात करतात. गंगेच्या चंद्रकोरीच्या आकाराच्या अस्सीपासून ते राजघाटापर्यंत पसरलेल्या घाट आणि इमारतींनाही आकर्षक विद्युत चौकटींनी सजवण्यात आले आहे. प्राचीन दशाश्वमेध, राजेंद्र प्रसाद घाट, पंचगंगा, राजघाट, नमोघाट, चेतसिंग घाट, ललिताघाट, अस्सी घाट येथे जास्तीत जास्त गर्दी होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.