Middle East News: इस्रायल (Israel ) आणि हिजबुल्लाह (Hezbollah) यांच्यात सुरू असलेल्या तणावादरम्यान, इस्रायली सैन्याने गुरुवारी तिसऱ्या दिवशी बेरूतच्या दक्षिणी उपनगरात हिजबुल्लाच्या लक्ष्यांवर हवाई हल्ले केले आहेत. पहाटे झालेल्या या बॉम्बस्फोटांमध्ये बेरूतच्या आकाशात धुराचे प्रचंड लोट उठताना दिसले, त्यामुळे लोकांमध्ये भीतीचे आणि असुरक्षिततेचे वातावरण पसरले आहे. लेबनॉनची सरकारी वृत्तसंस्था नॅशनल न्यूज एजन्सी (NNA) च्या म्हणण्यानुसार, या हल्ल्यांचा परिणाम केवळ बेरूतच नाही तर दक्षिण लेबनॉनच्या बिंत जबिल भागातही जाणवला. येथे रात्रभर झालेल्या हवाई हल्ले आणि तोफगोळ्यांमुळे अनेक इमारती आणि निवासी संकुलांचे मोठे नुकसान झाले आहे. याव्यतिरिक्त, बाझौरीयेह आणि जुमायजिमेह शहरांवर झालेल्या हल्ल्यांमध्ये किमान पाच लोक मारले गेले.
हिजबुल्लाहवर इस्रायलची कारवाई
सप्टेंबरच्या अखेरीपासून इस्रायलने इराण-समर्थित हिजबुल्लाविरुद्ध मोठी हवाई आणि जमीनी मोहीम सुरू केली आहे. सीमेवर वर्षानुवर्षे सुरू असलेल्या संघर्षात गुंतलेल्या हिजबुल्लाचा पाया आणि प्रभाव कमकुवत करण्याचा या मोहिमेचा उद्देश आहे. ही मोहीम गाझा युद्धाच्या समांतर होत असून त्यामुळे दोन्ही बाजूंनी अस्थिरता आणि तणाव वाढत आहे. तसेच मृत आणि जखमींचा आकडा सातत्याने वाढत आहे
बेरूतच्या उपनगरातील हल्ल्यांमुळे प्रभावित क्षेत्रे आधीच रिकामी करण्यात आली आहेत, त्यामुळे स्थानिक अधिकाऱ्यांनी गुरुवारच्या हल्ल्यांतील जीवितहानींची अधिकृत आकडेवारी जाहीर केलेली नाही. तथापि, लेबनॉनच्या आरोग्य मंत्रालयाने माहिती दिली आहे की 7 ऑक्टोबरपासून चालू असलेल्या इस्रायली हल्ल्यांमध्ये लेबनॉनमध्ये आतापर्यंत 3,365 लोकांचा मृत्यू झाला आहे आणि 14,344 लोक जखमी झाले आहेत.
युद्धबंदीसाठी वाटाघाटी करण्याचे प्रयत्न सुरूच आहेत
लेबनीज संसदेचे स्पीकर नबीह बेरी यांचे राजकीय सहाय्यक अली हसन खलील यांनी बुधवारी सांगितले की, अमेरिकेचे दूत आमोस हॉचस्टीन यांच्यासोबत युद्धविरामाचा प्राथमिक करार करण्यात आला आहे. खलीलने यांनी एका वाहिनीला मुलाखतीत सांगितले की, हा प्रस्ताव हॉचस्टीनच्या माध्यमातून इस्रायललाही पाठवण्यात आला होता, परंतु अद्यापपर्यंत इस्रायलकडून कोणताही प्रतिसाद मिळालेला नाही.