Jhansi medical college fire incident : उत्तर प्रदेशातील झाशी मेडिकल कॉलेजमधील नवजात शिशु अतिदक्षता केंद्रात काल रात्री 10.45 वाजता एक हृदयद्रावक घटना घडली आहे. ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटरमधील शॉर्ट सर्किटमुळे लागलेल्या आगीत 10 नवजात बालकांना आपला जीव गमवावा लागला आणि एनआयसीयूमधील अत्यंत ऑक्सिजनयुक्त वातावरणामुळे ही आग वेगाने पसरली. या दुर्दैवी घटनेमधील मृतांपैकी सात जणांची ओळख पटली आहे, तर इतर अनेक अर्भकं भाजली आहेत.विभागीय आयुक्त आणि डीआयजी यांच्या नेतृत्वाखाली या घटनेचा तपास सुरू आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी १२ तासांत अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.
वैद्यकीय महाविद्यालयात पोहोचलेले जिल्हा दंडाधिकारी अविनाश कुमार म्हणाले की, प्रथमदर्शनी, उपस्थित वैद्यकीय महाविद्यालयाच्या कर्मचाऱ्यांच्या मते, 10 मुलांचा मृत्यू झाल्याची पुष्टी झाली आहे. नवजात अतिदक्षता केंद्रात एकूण 54 बालकांना दाखल करण्यात आले होते.
ते म्हणाले की, विभागीय आयुक्त विमल दुबे आणि डीआयजी कलानिधी नैथानी यांच्या नेतृत्वाखाली तयार करण्यात आलेले पथक या घटनेचा तपास करत आहे. त्याचा अहवाल १२ तासांत मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना सादर केला जाईल. डीआयजी कलानिधी नैठानी यांनी सांगितले की, आग आटोक्यात आणण्यात आली आहे.
राज्याचे उपमुख्यमंत्री ब्रजेश पाठक आढावा घेण्यासाठी घटनास्थळी पोचले असून ते म्हणाले आहेत की, “नवजात बालकांचा मृत्यू दुर्दैवी आहे. सर्व बाजूंनी तपास सुरू आहे. पहिली चौकशी प्रशासकीय पातळीवर होणार आहे. हे काम आरोग्य विभाग करणार आहे. दुसरा तपास पोलीस प्रशासन करणार आहे. अग्निशमन विभागाचे पथकही यामध्ये सहभागी होणार आहे. याशिवाय दंडाधिकारी चौकशीच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. तपासात काही त्रुटी आढळून आल्यास जबाबदार कोणावरही कठोर कारवाई केली जाईल. सरकार मुलांच्या कुटुंबियांसोबत आहे”.
उपमुख्यमंत्री पाठक म्हणाले की, फेब्रुवारी महिन्यात येथे फायर सेफ्टी ऑडिट करण्यात आले होते. जून महिन्यात मॉक ड्रीलही घेण्यात आली होती. ही घटना कशी आणि का घडली हे तपास अहवाल आल्यानंतरच सांगता येईल.
दरम्यान उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी मृत्युमुखी पडलेल्या नवजात बालकांच्या पालकांना प्रत्येकी पाच लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे .तर मुख्यमंत्री मदत निधीतून जखमींच्या कुटुंबीयांना प्रत्येकी 50 हजार रुपयांची मदत करण्यात येणार आहे.
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या घटनेबाबत शोक व्यक्त करत ही घटना हृदय पिळवटून टाकणारी असल्याचे म्हंटले आहे.