गुजरातच्या मेहसाणामध्ये शुक्रवारी रात्री भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले. रिश्टर स्केलवर या भूकंपाची तीव्रता 4.2 इतकी नोंदवण्यात आली. भूकंपाचा केंद्रबिंदू जमिनीपासून सुमारे 10 किमी खाली होता.दरम्यान या भूकंपामुळे कुठलीही जीवित किंवा वित्तहानी झाली नसल्याची माहिती प्रशासनाने आज सकाळी दिली आहे .
या घटनेंतर स्थानिकांमध्ये मात्र घबराटीचे वातावरण होते. तसेच 2001च्या भूकंपाची आठवण झाल्यामुळे मेहसाणा येथे अनेकांनी काळाची रात्र जागवून काढल्याचे सांगितले.
मेहसाणासोबतच पाटण, बनासकांठा, पालनपूर, साबरकांठासह अनेक जिल्ह्यांमध्ये भूकंपाची तीव्रता लोकांना जाणवली. अहमदाबादच्या वडज, अंकुर, न्यू वडज आणि आसपासच्या परिसरातील स्थानिक लोकांनी भूकंपाची माहिती दिली आहे.
गुजरातशिवाय राजस्थान आणि मध्य प्रदेशातील अनेक भागातही भूकंपाची तीव्रता जाणवली. गुजरात सीमेजवळील राजस्थानच्या सिरोही जिल्ह्यात भूकंपाचे धक्के जाणवल्याचे लोकांनी सांगितले आहे.
गुजरातच्या मेहसाणा, पाटण, बनासकांठा, पालनपूर, साबरकांठा येथे भूकंपाचे धक्के जाणवले. मात्र लोकांच्या म्हणण्यानुसार, भूकंपाचे धक्के इतके जोरदार होते की त्यांना घराबाहेर पळावे लागले. लोक अजूनही घाबरलेले आहेत. गेल्या काही दिवसांपासून हवेत गारठा निर्माण झाला आहे. भूकंपाच्या एका धक्क्यानंतर पहाटेच्या सुमाराला पुन्हा धक्के बसण्याची शक्यता असते. त्यामुळे घाबरलेल्या नागरिकांनी संपूर्ण रात्र जागून काढली.
राज्यात 23 वर्षांपूर्वी झालेल्या विनाशकारी भूकंपाच्या आठवणी मनात ताज्या असल्यामुळे भूकंपाचे हादरे बसलेल्या परिसरात भीतीचे वातावरण होते. यापूर्वी 2001 मध्ये गुजरातच्या कच्छमध्ये भीषण भूकंप झाला होता, ज्यामध्ये 13 हजारांहून अधिक लोकांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. गुजरात राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या आकडेवारीनुसार, गेल्या 200 वर्षांत राज्यात 9 मोठे भूकंप झाले असून 2001 चा भूकंप सर्वाधिक प्राणघातक ठरला होता.