अमेरिकेचे नवनिर्वाचित अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी रशिया-युक्रेन युद्ध थांबवण्यासाठी आपले प्रशासन कटिबद्ध असेल असे सांगितले आहे. ‘अमेरिका फर्स्ट पॉलिसी इन्स्टिट्यूट’च्या एका कार्यक्रमात बोलताना, ट्रम्प यांनी युद्धातील मृतांच्या कुटुंबीयांबद्दल दुःख व्यक्त करत युद्ध थांबवण्यासोबतच पश्चिम आशियात शांतता प्रस्थापित करण्याचा आपला निर्धार व्यक्त केला.
ट्रम्प म्हणाले की, आम्ही रशिया आणि युक्रेनमधील स्थितीवर गंभीरपणे विचार करत आहोत. हे युद्ध थांबवायला हवे, कारण यात लाखो लोकांचा मृत्यू झाला आहे. त्यांच्या या भाषणामध्ये त्यांनी इतर देशांद्वारे युक्रेनवर बेकायदेशीर आक्रमण रोखण्याची आवश्यकता व्यक्त केली
अमेरिकेतील ५ नोव्हेंबरच्या निवडणुकीत विजय मिळवल्यानंतर ट्रम्प यांचे हे पहिले सार्वजनिक भाषण होते. त्यात त्यांनी पश्चिम आशिया आणि रशिया-युक्रेन युद्धाला थांबवण्यासाठी आपल्या प्रशासनाच्या प्रयत्नांची कल्पनाही मांडली.
कार्यक्रमात ट्रम्प यांनी ‘टेस्ला’चे मालक एलॉन मस्क आणि भारतीय-अमेरिकी उद्योजक विवेक रामस्वामी यांची देखील प्रशंसा केली. मात्र ट्रम्प यांच्या मागील कार्यकाळात रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्या बाबतीत असलेली अनुकूल भूमिका लक्षात घेता, युक्रेनमधील संघर्ष थांबविण्याच्या त्यांच्या प्रयत्नांबाबत आश्चर्य व्यक्त होत आहे.