आजपर्यंत तुम्ही नेहमी साथ दिली आहे. तुम्ही लोकसभेला गंमत केली आता विधानसभेला गंमत करू नका. नाहीतर तुमची जम्मत होईल, असे वक्तव्य उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज बारामतीत केले आहे .
विधानसभा निवडणुकीत बारामतीमधून अजित पवार निवडणूक लढवित असून, त्यांच्याविरोधात पुतण्या युगेंद्र पवार शरद पवार यांच्या राष्ट्रवादीकडून निवडणूक लढवित आहे. बारामतीतील चार गावांच्या दौऱ्यावर अजित पवार असून, पानसरेवाडी येथे त्यांनी गावकऱ्यांशी संवाद साधला.यावेळी गावकऱ्यांना कोणाच्या भावनिक आवाहनाला बळी पडू नका, नाहीतर बारामतीकरांना खूप मोठी किंमत मोजावी लागेल असा इशारा त्यांनी दिला आहे.
यावेळी एक कार्यकर्ता अजित पवारांना म्हणाला, प्रतिभाकाकींचे तुमच्यावर खूप प्रेम आहे. यावर अजित पवारांनी असलं प्रेम मला नको, असे उत्तर दिले आहे.
अजित पवार म्हणाले, घरातील दोन उमेदवार उभे राहिले आहेत. लोकसभेला जो निकाल दिला त्याबाबत माझं काही म्हणणं नाही. पण, आता मात्र गंमत केली तर जम्मत होईल. कारण त्यानंतर बारामतीकरांना कोणी वाली राहणार नाही तसेच त्यामुळे आता काय तो विचार करून निर्णय घ्या. असे त्यांनी सांगितले आहे. ‘मी समोरच्यावर टीका करायला गेलो, तर तो माझा पुतण्या आहेत. मला तो मुलासारखा आहे. पुन्हा आम्हीच आमच्या घरातल्यांवर एकमेकांवर टीका करतोय असं होईल. ते मला करायचं नाहीये. म्हणून मी पुन्हा सांगतो की भावनिक होऊ नका, असं आवाहन त्यांनी मतदारांना केले आहे.
महिलांना आधी पुरुष मंडळी पैसे द्यायचे आणि हिशेब मागायचे. आता महिलांना हिशेब द्यायची गरज नाही.अशी सोय आम्ही करून दिली आहे. असे म्हणत महायुतीने आणलेल्या लाडकी बहीण योजनेचा पुनरुच्चार केला आहे.