एकल टप्प्यातील महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी आज सकाळी 7 वाजता मतदानाला सुरुवात झाली आहे. 288 विधानसभा मतदारसंघात मतदान होत असून हे मतदान संध्याकाळी 6 वाजता संपणार आहे.
महायुती, महाविकास आघाडी आणि छोट्यामोठ्या राजकीय पक्षांची कसोटी पाहणाऱ्या या निवडणुकीत अनेक दिग्गज नेत्यांची तसेच त्यांच्या राजकीय वारसदारांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.देशातील आघाडीचे राज्य असलेल्या महाराष्ट्राची सूत्रे पुढील पाच वर्षासाठी कोणत्या राजकीय आघाडीकडे सोपवायची याचा फैसला राज्यातील जवळपास साडेनऊ कोटींहून अधिक मतदार आज करणार आहेत.
राज्यात एकूण 990 मतदान केंद्रे संवेदनशील म्हणून घोषित करण्यात आली आहेत. मतदानासाठी 1 लाख 64 हजार 996 बॅलेट युनिट, 1 लाख 19 हजार 430 कंट्रोल युनिट आणि 1 लाख 28 हजार 531 व्हीव्हीपॅट यंत्रे सज्ज ठेवण्यात आली आहेत. एकूण 1 लाख 427 मतदान केंद्रांपैकी 67 हजार 557 मतदान केंद्रांवर वेबकास्टिंग प्रक्रिया राबवली जाणार आहे.
एकूण 4,136 उमेदवार निवडणूक लढवत असून त्यात 2,086 अपक्षांचा समावेश आहे. भाजप 149, शिवसेना 81, आणि राष्ट्रवादी 59 जागा लढवत आहे. काँग्रेसने 101, शिवसेना (यूबीटी) 95, आणि राष्ट्रवादी (शरद पवार गट) 86 उमेदवार उभे केले आहेत. बसपा 237 जागा लढवत आहे, तर इतर छोटे पक्ष 237 जागा लढवत आहेत. देखील रिंगणात आहेत. राज्यात अंदाजे ९.७ कोटी नोंदणीकृत मतदार आहेत.
महाराष्ट्रातला 288 विधानसभा जागांसाठीचा प्रचार सोमवार, 18 नोव्हेंबर 2024 रोजी संपला होता. तर २३ नोव्हेंबर रोजी मतमोजणी होणार आहे.
महाराष्ट्र विधानसभेची प्राथमिक लढत भाजपच्या नेतृत्वाखालील महायुती आघाडी आणि काँग्रेसच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी (एमव्हीए) यांच्यात आहे.सत्ताधारी भाजपच्या नेतृत्वाखालील महायुती आघाडीमध्ये भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (अजित पवार गट) यांचा समावेश आहे, तर विरोधी महाविकासआघाडीमध्ये मध्ये काँग्रेस, शिवसेना (UBT), आणि राष्ट्रवादी (शरद पवार गट) यांचा समावेश आहे.
2019 च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत, भाजपने 105 जागा जिंकल्या होत्या. , शिवसेनेने 56 आणि काँग्रेसने 44 जागा जिंकल्या होत्या. तर 2014 मध्ये, भाजपने 122, शिवसेनेने 63 आणि काँग्रेसने 42 जागांवर दावा केला होता.