पश्चिम बंगालमधील सहा विधानसभा जागांसाठी झालेल्या पोटनिवडणुकीची मतमोजणी सुरू आहे. सुरुवातीच्या ट्रेंडमध्ये तृणमूल काँग्रेस सर्व सहा जागांवर आघाडीवर आहे.
हरोआ विधानसभा मतदारसंघात तृणमूल काँग्रेसचे उमेदवार शेख रबीउल इस्लाम यांनी 22 हजार 082 मतांची मोठी आघाडी घेतली आहे. मतमोजणीच्या पहिल्या आणि दुसऱ्या फेरीनंतर ही आघाडी अधिक मजबूत झालेली दिसून येत आहे .
मेदिनीपूरमध्ये दुसऱ्या फेरीच्या मतमोजणीनंतर तृणमूल काँग्रेस ५,८३६ मतांनी आघाडीवर आहे. तर नैहाटीमध्ये तृणमूलचे उमेदवार सनत डे यांनी 14 हजार 690 मतांची आघाडी घेतली आहे.
2021 मध्ये भाजपच्या ताब्यात असलेले मदारीहाट यावेळी तृणमूल काँग्रेसच्या बाजूने कल दर्शवत आहे. येथे तृणमूल सुमारे पाच हजार मतांनी पुढे आहे. ताल्डांगरामध्ये तृणमूलच्या उमेदवार फाल्गुनी सिंह यांनी तीन हजार ३०० मतांची आघाडी घेतली आहे.
कूचबिहारच्या सीताई विधानसभा मतदारसंघात तृणमूलच्या उमेदवार संगीता राय यांनी 15 हजार 300 हून अधिक मतांची आघाडी घेतली आहे.
2021 च्या विधानसभा निवडणुकीत तृणमूल काँग्रेसने या सहापैकी पाच जागा जिंकल्या होत्या. फक्त मदारीहाट जागा भाजपकडे होती. यावेळी तृणमूल काँग्रेसने सर्व सहा जागा जिंकण्याचे लक्ष्य ठेवले होते.सुरुवातीच्या ट्रेंडवरून हे लक्ष्य साध्य होत असल्याचे दिसते.
मतमोजणी केंद्रांवर त्रिस्तरीय सुरक्षा व्यवस्था लागू करण्यात आली आहे. केंद्रीय दले तैनात करण्यात आली आहेत, तर बाह्य सुरक्षा राज्य पोलिसांकडून हाताळली जात आहे. प्रत्येक केंद्रावर 300 हून अधिक पोलीस तैनात आहेत.
या सहा जागांवर १३ नोव्हेंबर रोजी पोटनिवडणूक झाली होती. या जागा नैहाटी, हरोआ, सीताई, मदारीहाट, तलदंगरा आणि मेदिनीपूर आहेत. विविध कारणांमुळे जागा रिक्त झाल्यानंतर या पोटनिवडणुका झाल्या. यातील बहुतांश जागा खासदारपदी निवडून आलेल्या आमदारांच्या राजीनाम्यामुळे रिक्त झाल्या आहेत.