Mahim Result 2024 : राज ठाकरेंच्या मनसेला विधानसभेत मोठे अपयश आलेले चित्र दिसत आहे. मनसेला राज्यात अजून एकही जागा मिळालेली नाही. विधानसभा निवडणुकीची तारीख जाहीर होताच मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी प्रचाराला सुरुवात केली होती.
मात्र, राज्यातील जनतेने मनसेला साथ दिलेली दिसत नाहीये, या विधानसभा निडवणुकीतून मनसेच्या हाती मोठी निराशा आली आहे. दरम्यान, शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जाणाऱ्या माहिम मतदारसंघात राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे यांचा पराभव झाला आहे.
येथे तिरंगी लढत झाली. मात्र, येथे अमित ठाकरे यांना पराभवाचा सामना करावा लागला. येथून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे महेश सावंत विजयी झाले आहेत.
शिवसेनेच्या फूटीनंतर येथील विद्यमान आमदार सदा सरवणकर यांनी एकनाथ शिंदे यांना साथ दिली. त्यामुळे माहिमची लढत शिवसेना उद्धव ठाकरे पक्षासाठीही महत्त्वाची होती. त्यांनी सदा सरवणकर यांचे एकेकाळचे शिष्य महेश सावंत यांना उमेदवारी दिली होती. तर, मनसे प्रमुख राज ठाकरे यांचे चिरंजीव अमित ठाकरे हे पहिल्यांदा निवडणुकीच्या मैदानात याच मतदारसंघातून उतरले होते. त्यामुळे अमित ठाकरे यांच्यासाठी ही निवडणूक महत्त्वाची होती.
दरम्यान, राज्यात महायुतीला आघाडी मिळाली असून, राज्यात पुन्हा महायुतीचे सरकार असेल हे आता जवळ-जवळ स्पष्ट झाले आहे. येत्या २६ तारखेला मुख्यमंत्र्यांचा कार्यकाळ संपणार असून, २५ तारखेला राज्याला पुढील मुख्यमंत्री मिळेल असे बोलले जात आहे. मात्र, महायुतीतून मुख्यमंत्री पदी कोणाची निवड होईल? हे आता निकाल आल्यानंतरच स्पष्ट होईल.