Devendra Fadnavis : “महाराष्ट्रातील जनतेने आम्हाला अभूतपूर्व विजय मिळवून दिला आहे. यावरून जनता पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पाठीशी असल्याचे दिसून येते. त्यांनी ‘एक हैं तो सुरक्षित हैं’चा नारा दिला. सर्व स्तरातील आणि समाजातील लोकांनी एकजुटीने आम्हाला मतदान केले…हा महायुतीचा विजय आहे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि रामदास आठवले, हा एकतेचा विजय आहे…” अशी प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुतीला मिळालेल्या यशानंतर देवेंद्र फडणवीस यांनी जनतेचे आभार मानले आहेत. महाराष्ट्रात २८८ जागांसाठी झालेल्या मतदानानंतर आज (२३ नोव्हेंबर) मतमोजणी सुरु आहे. आज सकाळपासून निकाल हा महायुतीच्या बाजूने दिसून आला.
सध्या महाराष्ट्रात 220 जागांवर महायुती आघाडीवर आहे. त्यापैकी 126 जागांवर भाजप विजयाच्या दिशेने वाटचाल करत आहे. तर महाविकास आघाडीला केवळ 50 जागा मिळताना दिसत आहेत. अशास्थितीत राज्यात महायुतीच सरकार स्थापन करणार हे जवळ-जवळ स्पष्ट आहे.
दरम्यान, राज्यात मिळालेल्या यशानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस,अजित पवार, यांना फोन करून शुभेच्छा दिल्या आहेत. सध्या राज्यभरात महायुतीच्या विजयाचा गुलाल उधळला जात असून, कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उत्साह साजरा करत आहेत, तसेच फटाके फोडून जल्लोष करत आहेत.