महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 चे स्पष्ट निकाल समोर आले असून महायुतीला दणदणीत विजय मिळाला आहे. निकालानंतर आता राज्यात सत्तास्थापनेच्या हालचालींना वेग आला आहे. दरम्यान महायुतीच्या मुख्यमंत्रीपदाचा फॉर्म्युलाही समोर आला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मुख्यमंत्रिपदासाठी दोन फॉर्म्युला निश्चित करण्यात आले असून त्यावर सध्या चर्चा सुरू आहे. तसेच दुसऱ्या बाजूला एकीकडे नव्या सरकारच्या शपथविधीची तयारी सुरु झाली असून मुंबईतील वानखेडे स्टेडियमची यासाठी निवड करण्यात आल्याचे सांगितले जात आहे.
एकामध्ये मुख्यमंत्रिपदाचं एक नवं सूत्र आता समोर आल्याचे पाहायला मिळत आहे. या नव्या फॉर्म्युल्यानुसार, महायुतीतल्या तीनही प्रमुखांना मुख्यमंत्रिपदाची संधी मिळणार असल्याची चर्चा आहे.२-२-१ वर्षे कार्यकाळ असा याचा फॉर्मुला असेल तर एका सूत्रानुसार, अडीच-अडीच वर्ष मुख्यमंत्रिपद वाटून घेण्याबाबत शिंदेसेना आग्रही आहे. ज्यामध्ये अडीच वर्ष भाजप तर, अडीच वर्ष शिवसेनेचा मुख्यमंत्री असेल.
अद्याप महायुतीला स्पष्ट बहुमत मिळून अजूनही शपथविधी आणि मुख्यमंत्रीपदाबाबत काहीही निर्णय घेण्यात आलेला नाही. याबाबत बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार म्हणाले आहेत की, सीएम पदाचा फॉर्मुला आम्ही एकत्र बसून ठरवणार आहोत. राज्याला अतिशय मजबूत असे स्थिर सरकार देवू. लोकांच्या आमच्याकडून अपेक्षा वाढल्या आहेत.
महायुतीच्या तिन्ही नेत्यांची दिल्लीत बैठक होणार आहे. भाजपचे जेष्ठ नेते अमित शाह यांच्याशी चर्चेनंतर पुढचा मुख्यमंत्री कोण होईल हे ठरणार आहे. या बैठकीत नेमके काय होणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.
मुख्यमंत्रिपदाबरोबरच मंत्रिपदाच्या फॉर्म्युलाला वरिष्ठांनी होकार दिल्यानंतर खातेवाटपाबद्दल निर्णय घेतला जाणार असल्याचे सांगितले जात आहे . मुख्यमंत्री पदी कोण विराजमान होणार, किती वर्षांसाठी, उपमुख्यमंत्री कोण होणार, या सर्वासाठीचा निर्णय आज दिवसभरात चित्र स्पष्ट होईल.
मंत्रिमंडळात ‘या’ 27 चेहऱ्यांना संधी मिळण्याची शक्यता
भाजपमधून देवेंद्र फडणवीस, गिरीष महाजन, सुधीर मुनगंटीवार, चंद्रशेखर बावनकुळे, मंगलप्रभात लोढा, सुरेश खाडे, प्रवीण दरेकर, पंकजा मुंडे, राहुल कुल, नितेश राणे, चित्रा वाघ, प्रसाद लाड, किसन कथोरे
शिवसेनेकडून एकनाथ शिंदे, भरत गोगावले, संजय शिरसाट, प्रताप सरनाईक, संजय राठोड, गुलाबराव पाटील, दादा भुसे
राष्ट्रवादीकडून अजित पवार, धनंजय मुंडे, दिलीप वळसे पाटील, आदिती तटकरे, छगन भुजबळ, धर्मरावबाबा अत्राम, अनिल पाटील