संसदेचे हिवाळी अधिवेशन आज सकाळी सुरू झाले परंतु तासाभरातच लोकसभा आणि राज्यसभा दिवसभरासाठी तहकूब करण्यात आली आहे. राज्यसभेत गौतम अदानी समूहावरील लाचखोरीच्या आरोपांवर विरोधी पक्षाच्या खासदारांनी चर्चा करण्याचा आग्रह धरल्याने कामकाज ठप्प झाले.
सुरवातीला संसदेचे वरिष्ठ सभागृह सकाळी 11.45 वाजेपर्यंत तहकूब करण्यात आले होते आणि त्यानंतर विरोधी पक्षाच्या खासदारांनी अदानी मुद्द्यावर चर्चेची मागणी लावून धरल्याने सभागृहाचे कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आले आहे. उद्या संविधान दिनानिमित्त दोन्ही सभागृहांचे कामकाज बंद राहणार आहे.
अधिवेशन तहकूब करण्यापूर्वी केंद्रीय मंत्री मनोहर लाल यांनी दिल्ली विकास प्राधिकरणाच्या (डीडीए) सल्लागार परिषदेसाठी एका सदस्याच्या निवडीसाठी प्रस्ताव मांडला. वरच्या सभागृहात आवाजी मतदानाने हा प्रस्ताव मंजूर करण्यात आला.त्यानंतर नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ मेंटल हेल्थ अँड न्यूरो-सायन्सेस (NIMHANS), बेंगळुरू येथे एका सदस्याच्या निवडीसाठी केंद्रीय मंत्री जेपी नड्डा यांनी मांडलेला दुसरा प्रस्तावही आवाजी मतदानाने स्वीकारण्यात आला.
थोड्या वेळाने सभापतींनी बुधवारी पुन्हा सभा दिवसभरासाठी तहकूब केली.राज्यसभेत विरोधकांच्या गदारोळामुळे सभापती जगदीप धनखड यांनी सभागृहाचे कामकाज दिवसभरासाठी तहकूब केले.तोच प्रकार लोकसभेतही घडला.
दरम्यान, आज संसदेचे हिवाळी अधिवेशन सुरू होण्यापूर्वी आपल्या भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, “आज जग भारताकडे मोठ्या आशेने पाहत आहे. संसदेच्या वेळेचा वापर आणि सभागृहातील आपले वर्तन असे असले पाहिजे. त्यामुळे जागतिक स्तरावर भारताला मिळालेला आदर अधिक वृद्धिगत होईल .” असे म्हणत यावेळी त्यांनी निरोगी चर्चेच्या महत्त्वावर भर दिला.
त्यांनी यावेळी विरोधी पक्षांवर ताशेरे ओढले की, निवडणुकीच्या वेळी जनतेने नाकारलेले लोक सभागृहाच्या कामकाजात अडथळा आणण्याचा प्रयत्न करतात.ते संसदेत चर्चा होऊ देत नाहीत. त्यांना लोकांच्या आकांक्षा समजत नाहीत. मला आशा आहे की संसदेच्या हिवाळी अधिवेशनात प्रत्येक पक्षाच्या नवीन सदस्यांना त्यांचे विचार मांडण्याची संधी मिळेल,” असे पंतप्रधान म्हणाले आहेत . तसेच ते पुढे म्हणाले की , “संसदेत निरोगी चर्चा व्हायला हवी, परंतु दुर्दैवाने, काही लोक स्वतःच्या राजकीय फायद्यासाठी संसदेवर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करत आहेत, व्यत्यय आणि अराजकतेचा अवलंब करत आहेत. “