महाराष्ट्राचे सखोल ज्ञान असणारा, शरद पवार यांच्यानंतर महाराष्ट्राची नीट माहिती असणारा तरुण नेता कोण असेल तर ते देवेंद्र फडणवीस आहेत. सर्वार्थाने महाराष्ट्राच्या हितासाठी त्यांच्या नेतृत्वाची गरज आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदींचा आशीर्वाद घेऊन, केंद्र सरकारचे पाठबळ घेऊन फडणवीस महाराष्ट्राला प्रगतीकडे नेऊ शकतात. या देशाला दिशा देणारा महाराष्ट्र ते उभा करू शकतात, असा ठाम विश्वास भाजपा विधानपरिषद गटनेते आ. प्रविण दरेकर यांनी व्यक्त केला आहे
पत्रकारांना संबोधित करताना दरेकर म्हणाले आहेत की, राजकीय निर्णय तेथील संख्याबळावर, परिस्थितीवर होत असतात. ज्यावेळी एकनाथ शिंदे राज्याचे मुख्यमंत्री झाले त्यावेळी भाजपाचे संख्याबळ जास्त होते. परंतु त्यावेळी असणाऱ्या सरकारला बदलणे आवश्यक होते त्यामुळे संख्याबळाचा विचार झाला नाही, असेही दरेकर म्हणाले आहेत.
दरेकर पुढे म्हणाले की, राज्यात आज जनतेने बहुमत देवेंद्र फडणवीस यांच्या बाजूने दिले आहे. संपूर्ण महाराष्ट्र नरेंद्र मोदींच्या मागे उभा राहिला आहे. अशा वेळी भाजपाच्या कार्यकर्त्यांची इच्छा आहे, माझीही इच्छा आहे, तशा प्रकारचे सुतोवाच आमच्या प्रदेशाध्यक्षांनी केले आहे की देवेंद्र फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री व्हायला हवेत याचे कारण राज्याला एक अभ्यासू, कुशल अशा नेतृत्वाची गरज असल्याचे दरेकर म्हणाले आहेत. .
फडणवीसांचा पाच वर्षाचा मुख्यमंत्री पदाचा कालावधी महाराष्ट्राने पाहिला आहे. महायुतीचे सरकार चालविण्याचे कौशल्य त्यांच्याकडे आहे. निवडणुका लढवत असताना तिन्ही पक्षांना एकत्रित ठेवणे, सगळ्या पक्षांना जागावाटपात प्रसंगी एखादे पाऊल मागे घेणे, उमेदवार नसला तर मित्र पक्षांना उमेदवारी देणे. त्यामुळे हे संयमी नेतृत्व आहे. त्यांच्याकडे समन्वयाची वेगळी भुमिका आहे. महायुतीला चांगला समन्वयक नेता हवा आहे ही राज्यातील जनतेची इच्छा असल्याचे दरेकर यांनी सांगितले आहे.