विधानसभेनंतर महायुतीला मिळालेल्या बहुमतानंतर सत्तास्थापनेच्या घडामोडीना वेग आला आहे. मात्र मुख्यमंत्रीपदासाठीचे अधिकृत नाव समोर आलेले नाही. या सर्व पार्श्वभूमीवर जुनी विधानसभा बरखास्त होण्याच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज राज्यपालांकडे आपला मुख्यमंत्री पदाचा राजीनामा सुपूर्द करणार असल्याचे सांगितले जात आहे. तांत्रिकदृष्ट्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर नवीन मुख्यमंत्र्यांचा शपथविधी सोहळा पार पडेपर्यंत एकनाथ शिंदे काळजी वाहू मुख्यमंत्री राहतील. आज जुनी विधानसभा बरखास्त होत असून तांत्रिकदृष्ट्या एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देणे अपेक्षित आहे. तेव्हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आज महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन यांच्याकडे आपला मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा सुपूर्द करतील अशी माहिती समोर येत आहे.
या सगळ्या घडामोडीमध्यें काल रात्री एकनाथ शिंदे यांनी केलेले ट्विट सध्या विशेष चर्चेत आहे. याचे कारण म्हणजे एकनाथ शिंदेंनी मुख्यमंत्री म्हणून कायम रहावे अशी इच्छा त्यांच्या पक्षातील नेत्यांनी स्पष्ट केली होती. तर दुसरीकडे भाजपाच्या नेत्यांनी ज्याचे जास्त आमदार त्याचा मुख्यमंत्री असा या सूत्रानुसार फडणवीसांनाच मुख्यमंत्री करण्याची मागणी केली आहे. दोन्ही बाजूने दबावतंत्र वापरण्याचा प्रयत्न सुरु असतानाच मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी त्यांच्या समर्थकांना एक महत्त्वाचे आवाहन केले आहे.रात्री 12 वाजून 53 मिनिटांनी त्यांनी आपल्या अधिकृत एक्स अकाऊंटवरुन एक पोस्ट केली आहे.
यामध्ये यामध्ये त्यांनी कार्यकर्त्यांना आपल्या घराबाहेर न जमण्याचे आवाहन केले आहे. “महायुतीच्या प्रचंड विजयानंतर राज्यात पुन्हा एकदा आपले सरकार स्थापन होणार आहे. महायुती म्हणून आपण एकत्रित निवडणूक लढवली आणि आजही एकत्रच आहोत. माझ्यावरील प्रेमापोटी काही मंडळींनी सर्वांना एकत्र जमण्याचे, मुंबईत येण्याचे आवाहन केले आहे. तुमच्या या प्रेमासाठी मी अत्यंत मनापासून ऋणी आहे. मात्र अशा पद्धतीने माझ्या समर्थनार्थ कुणीही एकत्र येऊ नये, असे आवाहन मी करतो आहे ,” असे मुख्यमंत्री शिंदेंनी या ट्विटमध्ये म्हणले आहेत .
तसेच, “माझी नम्र विनंती आहे की शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी वर्षा निवासस्थान किंवा अन्य कुठेही एकत्र जमू नये. समर्थ आणि समृद्ध महाराष्ट्रासाठी महायुती भक्कम होती, आहे आणि यापुढेही भक्कमच राहील,” असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला आहे.
महायुतीच्या प्रचंड विजयानंतर राज्यात पुन्हा एकदा आपले सरकार स्थापन होणार आहे. महायुती म्हणून आपण एकत्रित निवडणूक लढवली आणि आजही एकत्रच आहोत. माझ्यावरील प्रेमापोटी काही मंडळींनी सर्वांना एकत्र जमण्याचे, मुंबईत येण्याचे आवाहन केले आहे. तुमच्या या प्रेमासाठी मी अत्यंत मनापासून ऋणी…
— Eknath Shinde – एकनाथ शिंदे (@mieknathshinde) November 25, 2024
शिंदे यांना पुन्हा मुख्यमंत्रीपद मिळावे यासाठी शिवसेनेचे नेते मैदानात उतरले असून प्रसारमाध्यमांसमोर तशा प्रकारच्या प्रतिक्रियाही दिल्या जात आहेत. तसेच काही नेत्यांनी शिवसैनिकांना मुंबईत येण्याचे आवाहन केल्यामुळे असंख्य कार्यकर्ते मुंबईच्या दिशेने रवाना होण्याची शक्यता निर्माण झाली होती. यातून परिस्थिती चिघळू नये, यासाठी एकनाथ शिंदे यांनी स्वतःहून सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत भावनिक आवाहन केले असून कार्यकर्त्यांची समजूत घातली आहे.
तसेच विधानसभा निवडणुकीत शिवसेना-भाजप-राष्ट्रवादी काँग्रेसच्या महायुतीला भरभरून मतदान केल्याबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मतदारांचे आभार मानले आहेत.