पाकिस्तानचे माजी पंतप्रधान आणि क्रिकेटपटू इम्रान खान यांनी स्थापन केलेल्या पाकिस्तान तेहरीक-ए-इन्साफ (पीटीआय) ने आपल्या नेत्याच्या सुटकेच्या मागणीसाठी देशव्यापी निषेध सुरू केला आहे.इम्रान यांची पत्नी बुशरा बीबी यांनी समर्थकांना सांगितले आहे की जोपर्यंत इम्रान खान यांची सुटका होत नाही तोपर्यंत मोर्चा संपणार नाही.या पीटीआय समर्थकांच्या निदर्शनाला आता हिंसक वळण लागले आहे. नुकत्याच राजधानी इस्लामाबाद बाहेर निदर्शक आणि सुरक्षा दलांमध्ये झालेल्या चकमकीत एका पोलिस अधिकाऱ्याचा मृत्यू झाला आज . याशिवाय 119 जण जखमी झाले आहेत. इम्रान खानच्या पीटीआय या पक्षाने त्याच्या सुटकेच्या मागणीसाठी निदर्शने पुकारली होती. त्यानंतर गेल्या दोन दिवसांपासून सुरक्षा लॉकडाऊन लागू करण्यात आला होता. इस्लामाबादकडे जाणाऱ्या रस्त्यांवर बॅरिकेड्स लावण्यात आले होते.
पंजाब प्रांताचे पोलिस प्रमुख उस्मान अन्वर यांनी सांगितले की, इस्लामाबादच्या बाहेर आणि पंजाब प्रांतात इतर ठिकाणी झालेल्या संघर्षात एका पोलिस अधिकाऱ्याला गोळ्या घालून ठार करण्यात आले. तर अन्य 119 जण जखमी झाले आहेत. तसेच पोलिसांच्या 22 गाड्या जाळण्यात आल्या. दोन अधिकाऱ्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे त्यांनी सांगितले. हिंसक निदर्शनात आपले कार्यकर्तेही जखमी झाल्याचा दावा इम्रान खान यांच्या पक्षाने केला आहे.
पंजाबच्या माहिती मंत्री अजमा बुखारी यांनी एका पत्रकार परिषदेत सांगितले की, इस्लामाबादला जात असताना पाकिस्तान तेहरीक-ए-इन्साफ समर्थकांनी पोलिसांशी झटापट झाल्यानंतर अनेक पोलिसांना ‘ओलिस’ म्हणून ताब्यात घेतले होते. सध्याच्या केंद्र सरकारविरोधात समर्थक आक्रमक झाले आहे. कायद्यातील काही तरतुदीत बदल करून इम्रान खान यांना तुरूंगातच मारण्याचा सरकारचा डाव असल्याचा आरोप हे कार्यकर्ते करत आहेत. तसेच आताचे सरकार हे हुकूमशाही सरकार असल्याचा आरोप समर्थकांनी केला आहे.