विधानसभा निवडणुकीत महायुतीला स्पष्ट बहुमत मिळाल्यानंतर यानंतर राज्यात महायुतीतील कोण मुख्यमंत्री होणार याकडे अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे. दरम्यान आज जुनी विधानसभा बरखास्त होत असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन यांची भेट घेत आपला मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा सुपूर्द केला आहे. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार तसेच दादाजी भुसे आणि चंद्रकांत रघुवंशी हेदेखील उपस्थित होते
त्यानंतर राज्यपालांनी एकनाथ शिंदे यांच्याकडे पुढील मुख्यमंत्री निवडेपर्यंत आणि सरकारचा कारभार सुरु होईपर्यंत काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून कामकाज पाहण्याची जबाबदारी सोपवली आहे. मुख्यमंत्र्यांचा राजीनामा हा संपूर्ण मंत्रिमंडळाचा राजीनामा असतो. त्यामुळे मुख्यमंत्री यांनी राजीनामा दिल्यानंतर सर्व मंत्रीमंडळाचा राजीनामा हा घटनेनुसार ग्राह्य मानला जातो.
विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणी नंतर महायुतीला बहुमत मिळाले. या घटनेला आता ३ दिवस उलटून गेले आहेत. पण अदयाप महायुतीकडून राज्याच्या मुख्यमंत्रीपदाचा चेहरा जाहीर करण्यात आलेला नाही. मुख्यमंत्रीपदाची माळ पुन्हा एकदा एकनाथ शिंदेच्या गळ्यात पडणार का त्यांना अन्य कुठली महत्वाची जबाबदारी देण्यात येणार याकडे आता सर्वांचे लक्ष असणार आहे.