गेले काही दिवस बांगलादेशात हिंदूंवर होणारी दडपशाही दिवसेंदिवस वाढत असल्याचे दिसून आले आहे. २ दिवसांपूर्वी बांगलादेशात हिंदूंवर होत असलेल्या अत्याचाराच्या विरोधात बोलणारे इस्कॉनचे संत चिन्मय कृष्ण दास प्रभू यांना पोलिसांनी देशद्रोहाच्या आरोपाखाली अटक केली आहे.बांगलादेशात इस्कॉन गुरु चिन्मय कृष्ण दास यांना अटक केल्याच्या पार्श्वभूमीवर आम आदमी पार्टीचे नेते अरविंद केजरीवाल यांनी ही अन्यायकारक घटना असल्याचे सांगत केंद्र सरकारने या प्रकरणात हस्तक्षेप करावा, असे आवाहन केले आहे.
“संपूर्ण देश संत चिन्मय कृष्ण दास जी यांच्या पाठीशी एकजुटीने उभा आहे, ज्यांना बांगलादेशात अन्यायकारकरित्या अटक करण्यात आली होती. चिन्मय दास यांची सुटका करण्यासाठी मी केंद्र सरकारला या प्रकरणात लवकरात लवकर हस्तक्षेप करण्याची विनंती करतो,” असे केजरीवाल यांनी एक्सवर म्हंटले आहे.
भाजप नेते बिप्लब कुमार देब यांनी देखील चिन्मय दास यांच्या अटकेच्या घटनेचा निषेध केला आहे आणि बांगलादेश “अलोकशाही” असल्याची टीका केली. बांगलादेशातील “मानवताविरोधी” परिस्थितीवर संयुक्त आंतरराष्ट्रीय कारवाई करावी, असे आवाहन त्यांनी केले आहे .
दरम्यान, आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांनीही इस्कॉनच्या पुजाऱ्याच्या अटकेवर चिंता व्यक्त केली आणि मोहम्मद युनूस यांच्या नेतृत्वाखालील बांगलादेश सरकारला हिंदूंवर होणारे अत्याचार थांबवण्याची विनंती केली आहे. .
“बांगलादेश पोलिसांनी इस्कॉन बांगलादेशचे पुजारी ‘चिन्मय कृष्ण दास’ यांना ताब्यात घेतल्याचा निषेध करण्यासाठी आपण सर्वांनी एकत्र येऊ या. आम्ही मोहम्मद युनूस यांच्या नेतृत्वाखालील बांगलादेश सरकारला हिंदूंवरील अत्याचार थांबवण्याची विनंती करतो.बांगलादेशच्या निर्मितीसाठी आमचे जवान शहीद झाले, मात्र आमच्या हिंदू बंधू भगिनींना ज्या प्रकारे लक्ष्य केले जात आहे ते पाहून आम्ही व्यथित झालो आहोत संयुक्त राष्ट्रांना हस्तक्षेप करण्याची विनंती करा,” असे कल्याण यांनी आपली एक्सवरील पोस्टमध्ये म्हंटले आहे.
सोमवारी अटक करण्यात आलेल्या चिन्मय कृष्णा दास यांना चितगाव न्यायालयात हजर करण्यात आले होते. मात्र न्यायालयाने त्यांचा जामीन अर्ज फेटाळला आणि त्यांची कोठडीत रवानगी केली आहे .या घटनेच्या पार्श्वभूमीवर काल देशभरात अनेक हिंदूंनी निदर्शने केली. तसेच चिन्मय दास यांच्या अनुयायांनी न्यायालयाच्या आवारात निदर्शने केली आहेत.