दीर्घ संघर्षानंतर, इस्रायल आणि इराण समर्थित हिजबुल्लाह या दहशतवादी गटाने युद्धविरामाला सहमती दिल्याने लेबनॉनमधील लढाई थांबली आहे . आज म्हणजे २७ नोव्हेंबर रोजी पहाटे ४ वाजता अधिकृतपणे युद्धविराम लागू झाला. यासह, लढाईदरम्यान लेबनॉनमधून विस्थापित झालेल्या हजारो लोकांनी मायदेशी परतण्याचे मान्य केले आहे. युनायटेड स्टेट्स आणि फ्रान्सच्या संयुक्त निवेदनात युद्धबंदीला पुष्टी देण्यात आली आहे.दरम्यान, इस्रायल आणि हिजबुल्लामध्ये युद्धविरामाचा करार झाला असला तरी गाझामधील हमासविरुद्धची कारवाई सुरूच राहणार असल्याची माहिती समोर आली आहे.
द न्यूयॉर्क टाईम्सच्या मते, इस्रायल आणि लेबनॉनच्या दहशतवादी गट हिजबुल्लाह यांच्यातील दशकांच्या इतिहासातील सर्वात प्राणघातक युद्ध संपवण्यासाठी युद्धविराम आज पहाटे 4 वाजता अधिकृतपणे अंमलात आला. याची घोषणा होताच दक्षिण बेरूतमधील दहियामध्ये पुनर्बांधणीचे काम सुरू झाले. हिजबुल्लाचे मुख्यालय दहिया येथे आहे. एकेकाळी दाट लोकवस्ती असलेल्या दहियामध्ये सध्या मोजकेच लोक राहत आहेत.
दरम्यान, लेबनीज सैन्याने विस्थापित नागरिकांना दक्षिण लेबनॉनमधील शहरे आणि गावांमध्ये परत येण्यापूर्वी इस्रायली सैन्याच्या माघारीची प्रतीक्षा करण्याचे आवाहन केले आहे. तसेच स्फोट न झालेल्या शस्त्रास्त्रांच्या धोक्यांबाबतही इशारा दिला आहे. लेबनीज अधिकाऱ्यांनी सांगितले की, युद्धविराम लागू झाल्यानंतर काही तासांनी विस्थापित कुटुंबे दक्षिण आणि पूर्व लेबनॉनमध्ये परत येऊ लागली. सध्या संयुक्त राष्ट्रांच्या अंतरिम शांती दलाचे १० हजार सैनिक लेबनॉनमध्ये आहेत.
लष्कराचे प्रवक्ते अविचाई अद्राई यांनी सांगितले की, युद्धविरामाच्या अटींनुसार देशाचे सैनिक दक्षिण लेबनॉनमध्ये उपस्थित आहेत. अद्राईने लेबनीज विस्थापित लोकांना ताबडतोब परत न जाण्याचा इशारा दिला आहे . सुरक्षित हालचाल होण्याची चिन्हे दिसताच त्यांची माहिती दिली जाईल. या युद्धबंदीमुळे इस्रायलमधील परिस्थिती तुलनेने शांत दिसून आली. मध्यरात्रीपासून देशात कोणताही नवीन हवाई हल्ल्याचा सायरन वाजलेला नाही. ह्या युद्धविरामाचा उद्देश इस्रायल आणि हिजबुल्ला यांच्यातील एक वर्षाहून अधिक काळ सुरू असलेली लढाई संपवणे हे आहे.
लेबनीज आरोग्य मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, इस्रायली सैन्याच्या बॉम्बहल्ला आणि जमिनीवरील कारवाईत सुमारे 3,800 लोक मारले गेले आहेत. दहा लाखांहून अधिक लोक विस्थापित झाले आहेत.
ह्या युद्धबंदीची घोषणा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी वॉशिंग्टनमध्ये केली. युनायटेड स्टेट्स आणि फ्रान्सने संयुक्त निवेदनात युद्धविरामाच्या अटी आणि अपेक्षा स्पष्ट केल्या आहेत. अमेरिका आणि फ्रान्स या युद्धबंदीवर लक्ष ठेवणार आहेत.
युद्धविरामाच्या अटी काय असणार ?
१) करारामध्ये फक्त ६० दिवसांच्या युद्धविरामाचा उल्लेख करण्यात आला आहे, ज्याअंतर्गत हिजबुल्लाह दक्षिण लेबनॉनमधून मागे हटताच इस्रायली सैन्य देखील माघार घेईल.
२) युद्धविराम करारात लितानी नदीच्या दक्षिणेकडील भागात हजारो लेबनीज सैन्य आणि संयुक्त राष्ट्र शांततारक्षक तैनात करण्याची तरतूद आहे.
३) अमेरिकेच्या अध्यक्षतेखालील एक आंतरराष्ट्रीय गट सर्व पक्षांद्वारे अटींचे पालन करण्यावर लक्ष ठेवेल. अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांच्या म्हणण्यानुसार या कराराचा उद्देश शत्रुत्व कायमचा संपवणे हा आहे.
४) हिजबुल्लाहने कराराचे उल्लंघन केल्यास त्याच्यावर कारवाई केली जाईल, असे इस्रायलने म्हटले आहे, मात्र लेबनॉनने याला विरोध केला आहे. लेबनीज अधिकाऱ्यांनी या तरतुदीला करारात समाविष्ट करण्यास विरोध केला आहे.