मणिपूर, उद्योगपती अदानी आणि संभल येथील हिंसाचार या मुद्यावरून विरोधकांनी सलग चौथ्या दिवशी गोंधळ कायम ठेवल्यामुळे लोकसभा व राज्यसभा या दोन्ही सभागृहांचे कामकाज सोमवार 2 डिसेंबर पर्यंत तहकूब करण्यात आले आहे .गेले ४ दिवस संसदेतले एकूण कामकाज केवळ 40 मिनिटे चालले.तर दररोज सरासरी 10 मिनिटे सभागृहाचे कामकाज चालले आहे .
संसदेच्या कामकाजाला आज, शुक्रवारी सकाळी 11 वाजता सुरुवात झाली. सभागृहाचे कामकाज सुरू होताच, विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना मणिपूर, संभलमधील हिंसाचार आणि अदानी मुद्द्यावरून घेरले. या मुद्द्यावरून विरोधी पक्षांनी दोन्ही सभागृहात गदारोळ घातला आणि घोषणाबाजी केली. यानंतर सभागृहाचे कामकाज 2 डिसेंबरपर्यंत तहकूब करण्यात आले. लोकसभेत इंडिया आघाडीच्या खासदारांनी संभल. मणिपूर आणि उद्योगपती अदानी प्रकरणातील हिंसाचारावर चर्चेची पुन्हा मागणी केली. परंतु लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांनी विरोधी पक्षातील खासदारांचा स्थगन प्रस्ताव फेटाळला. यावरून विरोधक आक्रमक झाले. त्यांनी सभागृहात जोरदार निदर्शने आणि घोषणाबाजी केली.
शुक्रवारी सभापती ओम बिर्ला म्हणाले- सहमती-असहमती ही लोकशाहीची ताकद आहे. मला आशा आहे की सर्व सदस्य सभागृहाचे कामकाज चालू देतील. देशातील जनता संसदेबाबत चिंता व्यक्त करत आहे. सभागृह सर्वांचे आहे, देशाला संसद चालवायची आहे.
त्यामुळे आज दिवसभरासाठी दोन्ही सभागृहाचे कामकाज तहकूब करण्यात आली.संसदेच्या लोकसभा आणि राज्यसभा सभागृहाचे कामकाज 2 डिसेंबर रोजी सकाळी 11 वाजेपर्यंत तहकूब करण्यात आले आहे. तर राज्यसभेत सभापती जगदीप धनखड यांनी नियम 267 अंतर्गत विविध विरोधी पक्षांच्या सर्व 16 नोटिसा फेटाळल्या. दरम्यान, वक्फ (दुरुस्ती) विधेयकाचे परीक्षण करणाऱ्या संयुक्त संसदीय समितीचा (जेपीसी) कालावधी अर्थसंकल्पीय अधिवेशन 2025 च्या शेवटच्या दिवसापर्यंत वाढवण्याचा प्रस्ताव राज्यसभा सभागृहाने मंजूर केला आहे .