सत्तेतून पायउतार होत असताना अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांनी त्यांचा मुलगा हंटर बायडेन याला बिनशर्त माफी जाहीर केली आहे. राष्ट्राध्यक्ष बिडेन यांनी रविवारी रात्री हंटरची बिनशर्त माफी जाहीर केली. हंटरला सध्या अनेक कायदेशीर प्रकरणांचा सामना करावा लागत आहे, ज्यात करचुकवेगिरीपासून बेकायदेशीरपणे शस्त्रे बाळगणे, सरकारी पैशांचा गैरवापर आणि खोटी साक्ष देणे अश्या गंभीर प्रकरणांचा समावेश आहे.
न्यूयॉर्क टाइम्सच्या बातमीनुसार, व्हाईट हाऊसने यासंदर्भात एक निवेदन जारी केले आहे. निवेदनानुसार, बायडेन म्हणाले की त्यांनी आपल्या मुलाला क्षमा करण्याचा निर्णय घेतला आहे. बायडेन म्हणाले आहेत की “ते हंटरला 1 जानेवारी 2014 ते डिसेंबर 1, 2024 दरम्यान केलेल्या गुन्ह्यांसाठी माफी देत आहेत ” हंटर यांच्यावरील आरोप राजकीय हेतूने प्रेरित असल्याचे बायडेन यांनी निवेदनात म्हटले आहे. त्यामुळेच आपण हा निर्णय घेतल्याचे जाहीर केले आहे. राजकीयदृष्ट्या मला दुखावण्यासाठी हे आरोप करण्यात आल्याचे सांगत बायडेन म्हणाले आहेत की “काँग्रेसमधील माझ्या अनेक राजकीय विरोधकांनी माझ्यावर हल्ला करण्यासाठी आणि माझ्या निवडणुकीला विरोध करण्यासाठी हे आरोप झाले आहेत.
अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांचा मुलगा हंटर बायडेन यांच्यावर करचुकवेगिरीपासून बेकायदेशीरपणे शस्त्रे बाळगणे, सरकारी पैशांचा गैरवापर आणि खोटी साक्ष देणे यासारखे आरोप आहेत. दरम्यान हंटर बायडेन यांनी डेलावेअर न्यायालयात कर फसवणूक आणि बेकायदेशीरपणे शस्त्र बाळगल्याचा आरोप स्वीकारला होता.
अध्यक्ष बायडेन म्हणाले आहेत की एका बापाने आणि राष्ट्राध्यक्षांनी हा निर्णय का घेतला हे अमेरिकन लोकांना काही दिवसांनी समजेल. माफीच्या घोषणेनंतर, हंटरने एक निवेदन देखील जारी केले. तो म्हणाला, “माझ्या व्यसनाच्या वाईट दिवसात केलेल्या माझ्या चुकांची मी कबुली दिली आहे आणि जबाबदारी घेतली आहे. या चुकांमुळे त्यांचा आणि त्यांच्या कुटुंबाचा जाहीर अपमान झाला होता.
हंटरला डेलावेअर न्यायालयात 4 डिसेंबर रोजी शिक्षा सुनावण्यात येणार होती. बेकायदेशीररीत्या बंदूक विकत घेतल्यास जास्तीत जास्त 25 वर्षे तुरुंगवासाची शिक्षा होऊ शकते, परंतु अनेक कायदेतज्ज्ञांच्या मते, हा पहिला फौजदारी खटला असल्याने त्याला 12 ते 16 महिन्यांची शिक्षा होऊ शकते. तथापि, यापूर्वी बायडेन यांनी वारंवार हंटरला माफ करणार नसल्याचे सांगितले होते.