महाराष्ट्रात नवीन सरकार स्थापन करण्याच्या हालचालींना प्रचंड वेग आला आहे. महायुती सरकारचा शपथविधी अवघ्या काही तासांवर येऊन ठेपला असताना राज्याचे काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रकृती अजूनही पूर्ण बरी झाली नसल्याची माहिती समोर आली आहे. एकनाथ शिंदे हे त्यांच्या दरे या मूळगावी गेले होते तेव्हा त्यांची तब्येत बिघडली होती. यानंतर ते मुंबईत परतले होते. एकनाथ शिंदे यांची प्रकृती सुधारेल आणि ते मुंबईत येऊन बैठकांना हजेरी लावतील, अशी अपेक्षा होती. मात्र, आज समोर आलेल्या माहितीनुसार एकनाथ शिंदे यांची तब्येत अद्यापही ठीक नसल्याचे समजत आहे.
एकनाथ शिंदे यांना बरं वाटत नसल्याने ते आज दुपारी ठाणे येथील ज्युपिटर रुग्णालयात दाखल झाले होते .त्यांचे चेकअप केल्यानंतर ते काही वेळाने रुग्णालयातून बाहेर पडले. यानंतर ते रस्ते मार्गाने मुंबईच्या दिशेला रवाना झाले. एकनाथ शिंदे यांना ताप आला होता. तसेच त्यांच्या घशात संसर्ग झाल्याची माहिती आहे. यासाठी आपण रुग्णालयात आलो होतो असे स्पष्टीकरण ज्युपिटरमधून बाहेर पडताना त्यांनी दिले आहे.
एकनाथ शिंदे यांना गेल्या काही दिवसांपासून ताप येत आहे. त्यामुळे त्यांची डेंग्यू आणि मलेरियाची चाचणी करण्यात आली होती. या दोन्ही चाचणीचा रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे. मात्र, शिंदे यांच्या पांढऱ्या पेशी कमी जास्त होत आहेत. त्यामुळे अजूनही त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. सतत येत असणाऱ्या तापामुळे अँटी बायोटिक औषधे सुरु आहेत. त्यामुळे शिंदे यांना सध्या अशक्तपणा जाणवत असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे. एकनाथ शिंदे यांची प्रकृती सुधारत असल्याचेही डॉक्टरांनी सांगितले. परंतु, डॉक्टरांनी एकनाथ शिंदे यांना तुर्तास आराम करण्याचा सल्ला दिला आहे. ज्युपिटर रुग्णालयातील तज्ञ डॉक्टरांकडून एकनाथ शिंदे यांच्यावर सध्या उपचार सुरु आहेत.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काही दिवसांपूर्वी दिल्लीत महायुतीच्या बैठकीसाठी गेले होते. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासोबत झालेल्या या बैठकीत एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार उपस्थित होते. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा या बैठकीला होते. या बैठकीनंतर एकनाथ शिंदे मुंबईला परत न येते थेट साताऱ्यातील आपल्या दरे या मूळगावी गेले. त्यामुळे एकनाथ शिंदे नाराज असल्याच्या चर्चा सुरु झाल्या. दरेगावात ते आजारी असल्याची माहिती शिवसेना नेत्यांनी दिली. त्यानंतर एकनाथ शिंदे यांनी माध्यमांशी संवाद साधला. तसेच एकनाथ शिंदे यांच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी त्यांच्या प्रकृतीची माहिती दिली. दरम्यान, एकनाथ शिंदे यांची तब्येत अजूनही बरी नसल्याने आजही एकनाथ शिंदे कुठेही बैठकीला जाणार नसल्याचे सांगितले जात आहे.