मुंबईत आज भाजपच्या विधिमंडळ पक्षनेतेपदी देवेंद्र फडणवीस यांची एक मुखाने निवड करण्यात आल्यानंतर देवेंद्र फडणवीस हेच राज्याचे नवे मुख्यमंत्री होणार हे स्पष्ट झाले आहे.त्यानंतर शिवसेना नेते एकनाथ शिंदे, राष्ट्रवादीचे अजित पवार आणि भाजप नेते देवेंद्र फडणवीस हे तिन्ही नेते राजभवनाच्या दिशेने रवाना झाले. राज्यपालांसमोर सत्तास्थापनेचा दावा केल्यानंतर त्यांनी पत्रकारांना संबोधित केले. यावेळी शिवसेनेचा मुख्यमंत्री पदासाठी देवेंद्र फडणवीस यांना पाठिंबा असल्याचे जाहीर करत एकनाथ शिंदे यांनी आपण महायुतीमध्ये नाराज नाही हे सरळसरळ जाहीर केले.
यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ शिंदे यांच्याबाबत मोठं वक्तव्य करत “एकनाथ शिंदे यांना मंत्रिमंडळात राहावे अशी आपण विनंती केली असल्याचे सांगितले आहे. तसेच त्यांच्या आमदारांचीही तीच विनंती आहे. त्यांचा आम्हाला सकारात्मक प्रतिसाद मिळेल अशी आशा आहे”,असेही फडणवीस म्हणाले आहेत.
याबाबत एकनाथ शिंदे यांना तुम्ही मंत्रिमंडळात सहभागी होणार का याबाबतचा प्रश्न एकनाथ शिंदे यांना विचारण्यात आला. त्यावर त्यांनी थेट उत्तर देणे टाळत तुम्ही जरा दम काढा. जे काही आहे ते सध्याकाळपर्यंत स्पष्ट होईल. कोण शपथ घेणार कोण शपथ घेणार नाही हे सर्व काही सांगितलं जाईल असे उत्तर दिले आहे. तर राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी मात्र आपण शपथ घेणार आहोत. आपण काही थांबणार नाही असे मिश्कीलपणे स्पष्ट केल्याचे दिसून आले आहे.
“आमच्यात कोण मोठा कोण छोटा असं काही नव्हते आणि आताही नाही .आम्ही एकत्र काम करत होतो. तसेच सरकार सर्वसामान्यांसाठी असते . आम्ही विकास आणि योजना याची सांगड घातली”, असे एकनाथ शिंदे यांनी आपल्या भाषणात म्हंटले आहे.
दरम्यान काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नव्या मंत्रिमंडळात सहभागी होण्यासाठी तयार असल्याची माहिती समोर आली असून ते उपमुख्यमंत्री पद स्वीकारणार आणि फडणवीस सरकारमध्ये सामील होणार असे सांगितले जात आहे.