संसदेच्या हिवाळी अधिवेशनादरम्यान आज राज्यसभा सभागृहात 222 क्रमांकाच्या आसनावर चलनी नोटांचे बंडल आढळून आले. हे आसन काँग्रेस खासदार अभिषेक मनु सिंगवी यांचे आहे. त्यांच्या जागेवर नोटांचे बंडल आढळून आल्यामुळे एकच खळबळ उडाली असून या प्रकरणी राज्यसभेचे सभापती जगदीप धनखड यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत.
यासंदर्भात सभागृहाला माहिती देताना राज्यसभा सभापती जगदीप धनखड म्हणाले की, गुरुवारी (5 डिसेंबर रोजी) सभागृहाचे कामकाज आटोपल्यानंतर सभागृहाची तपासणी सुरू असताना आसन क्रमांक 222 वर चलनी नोटांचे एक बंडल आढळून आले. हे आसन काँग्रेस नेते अभिषेक मनु सिंघवी यांना देण्यात आले आहे. नोटांचे बंड आढळल्याचे समजताच यासंदर्भात चौकशीचे आदेश देण्यात आल्याचे उपराष्ट्रपती धनखड यांनी सांगितले. दरम्यान अभिषेक मनू सिंघवी यांनी सदर बंडल आपले नसल्याचे सांगितले. मी राज्यसभेत जाताना फक्त 500 रुपयांची नोट घेऊन जातो. मी पहिल्यांदाच याबद्दल ऐकले. मी दुपारी 12.57 वाजता सभागृहात पोहोचलो आणि दुपारी 1 वाजता सभागृह तहकूब झाले. त्यानंतर, मी दुपारी 1.30 पर्यंत कॅन्टीनमध्ये बसलो. अयोध्येचे खासदार अवधेश प्रसाद यांच्यासमवेत संसदेतून बाहेर पडलो असे त्यांनी सांगितले.
या प्रकरणावरून आता राज्यसभेत गदारोळ सुरू झाला असून आरोप-प्रत्यारोपाला सुरुवात झाली आहे. भाजपचे खासदार जेपी नड्डा यांनी देखील विरोधी पक्षावर हल्लाबोल केला. ही घटना सामान्य नसून सभागृहाच्या प्रतिष्ठेवरचा हा हल्ला असल्याची टीका नड्डा यांनी केली आहे . तर या घटनेची चौकशी केली जाईल, असे राज्यसभा अध्यक्षांनी म्हटले आहे.सभागृहातील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खर्गे म्हणाले आहेत की, सभापतींनी या प्रकरणाची चौकशी करावी.