दिनांक ५ नोव्हेंबर रोजी देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून तिसऱ्यांदा शपथ घेतली. त्यानंतर राज्यात महायुतीचे सरकार स्थापन झाल्यानंतर भारतीय प्रशासकीय सेवेतील वरिष्ठ अधिकारी डॉ. श्रीकर परदेशी यांची नियुक्ती मुख्यमंत्री कार्यालयात सचिव पदावर करण्यात आली आहे. श्रीकर परदेशी यांनी जिल्हाधिकारी आणि महापालिका आयुक्त म्हणून अनेक जिल्ह्यात काम केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनाही त्यांच्या कामाची पद्धत आवडल्यामुळे त्यानंतर २०१५ मध्ये त्यांना थेट राजधानी दिल्लीत पीएमओ म्हणजेच पंतप्रधान कार्यालयात उपसचिव पदावर नियुक्त करण्यात आले होते.
परदेशी यांनी यापूर्वीही देखील देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत काम केले आहे. यापूर्वी 12 जुलै 2022 रोजी श्रीकर परदेशी यांची तत्कालीन उपमुख्यमंत्र्याचे उपसचिव म्हणून बदली करण्यात आली होती. त्यावेळी देवेंद्र फडणवीस हे उपमुख्यमंत्री होते. म्हणजेच आता देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्यानंतर श्रीकर परदेशी यांची मुख्यमंत्र्यांचे मुख्य सचिव म्हणून बदली करण्यात आली आहे.
पिंपरी चिंचवड आयुक्तपदावर असताना वीसमजली इमारतींचे अतिक्रमण त्यांनी जमीनदोस्त केले होते , तेव्हा नागरिकांनी त्यांना ‘बुलडोझर मॅन’ अशी उपमा दिली होती. त्यांनी राज्य सरकारचा सर्वोत्कृष्ट जिल्हाधिकारी हा किताबही पटकावला आहे.
श्रीकर परदेशी हे मूळचे सांगली जिल्ह्यातील कवठेमहांकाळचे आहेत. त्यांचे एमबीबीएस- एमडीचे शिक्षण पूर्ण झाले आहे. तसेच विशेष गोष्ट म्हणजे 2001 मध्ये ते महाराष्ट्रातून पहिल्या प्रयत्नात यूपीएससी उत्तीर्ण झाले होते.