बांगलादेशात काही दिवस चालू असलेल्या हिंदूंवरील अत्याचारांच्या पार्श्वभूमीवर भारताचे परराष्ट्र सचिव विक्रम मिस्त्री ९ डिसेंबरला बांगलादेशला भेट देणार आहेत. यादरम्यान द्विपक्षीय मुद्द्यांवर चर्चा करण्यासाठी बांगलादेशच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांसह तसेच समकक्षांसह या भेटीमध्ये बैठकांचा समावेश असणार आहे. देशाचे परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी ही माहिती दिली आहे.
दुसरीकडे, बांगलादेशात अल्पसंख्याकांची, विशेषत: हिंदूंची परिस्थिती आणि हिंदू धर्मगुरूंच्या अटकेच्या मुद्द्यावर परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्याने पुन्हा एकदा भारताच्या भूमिकेचा पुनरुच्चार केला आणि म्हटले आहे की, बांगलादेशात स्थायिक हिंदू लोकांच्या कायदेशीर अधिकारांची काळजी घेतली जावी तसेच त्यांची सुरक्षा अबाधित राहावी.तसेच बांगलादेशात सुरू असलेल्या संबंधित कायदेशीर प्रक्रिया संबंधित व्यक्तींच्या कायदेशीर अधिकारांचा पूर्ण सन्मान राखून, निष्पक्ष आणि पारदर्शक पद्धतीने राबवल्या जाव्यात, अशी आमची अपेक्षा आम्ही पुन्हा व्यक्त करू इच्छितो.’
बांगलादेशात सत्तापालट झाल्यापासून अल्पसंख्याक समुदायांना विशेषतः हिंदूंना लक्ष्य केले जात आहे. कट्टरतावादी हिंदू मंदिरांवर सातत्याने हल्ले करत आहेत. तेथे राहणारे हिंदू लोक अडचणीत सापडल्याच्या घटना वारंवार समोर येत आहेत. हे सर्व बांगलादेशच्या मोहम्मद युनूस सरकारच्या पाठिंब्याने होत असल्याचे बोलले जात आहे. बांगलादेशात राहणाऱ्या हिंदूंवर होणाऱ्या अत्याचाराविरोधात भारतातील विविध शहरांमध्ये निदर्शने होत आहेत.
आता जगभरातून अल्पसंख्याकांवर होणाऱ्या हल्ल्यांच्या निषेधार्थ आवाज उठवला जात आहे. देशात राहणाऱ्या हिंदू समाजाच्या लोकांचे संरक्षण करण्याची संपूर्ण जबाबदारी बांगलादेश सरकारची आहे, असे अमेरिकेचे खासदार ब्रॅड शर्मन यांनी म्हटले आहे. बांगलादेशातील अल्पसंख्याकांवर होणाऱ्या हल्ल्यांची चौकशी करण्याची मागणीही शर्मन यांनी संयुक्त राष्ट्र मानवाधिकार परिषदेचे प्रमुख वाल्कर तुर्क यांच्याकडे केली आहे. .
भारताचे सीरिया आणि दक्षिण कोरियातील घडामोडींवर बारीक लक्ष
सीरियातील उत्तरेकडील शहरांमध्ये विरोधकांशी झालेल्या चकमकी आणि दक्षिण कोरियामध्ये लष्करी कायदा लागू केल्याबद्दल प्रतिक्रिया देताना भारताने परिस्थितीवर बारकाईने नजर ठेवल्याचे म्हटले आहे. परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल म्हणाले की, आम्ही उत्तर सीरियातील वाढत्या संघर्षाच्या अलीकडच्या घडामोडींची दखल घेतली आहे. आम्ही परिस्थितीवर बारीक लक्ष ठेवून आहोत. सध्या 90 भारतीय सीरियात आहेत आणि यामध्ये संयुक्त राष्ट्र संघटनेत काम करणाऱ्या भारतीयांचाही समावेश आहे. आमचा दूतावास त्यांच्याशी जवळचा संपर्क ठेवून आहे आणि त्यांच्या सुरक्षिततेसाठी काम करत आहे.
दक्षिण कोरियाबाबत जयस्वाल यांनी सांगितले की, भारताचे दक्षिण कोरियाशी मजबूत आर्थिक आणि राजकीय संबंध आहेत. अलीकडच्या घडामोडींचा तेथे राहणाऱ्या भारतीयांवर आणि आपल्या हितसंबंधांवर परिणाम होऊ शकतो. आम्ही सतत परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहोत. आम्हाला आशा आहे की परिस्थिती लवकरच सुधारेल.
दहशतवादी मसूद अझहरवर ठोस कारवाई करण्याची मागणी
परराष्ट्र मंत्रालयाने पुन्हा एकदा पाकिस्तानकडे संयुक्त राष्ट्राने घोषित दहशतवादी मसूद अझहरवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्याचे हे वक्तव्य नुकत्याच आलेल्या एका अहवालातुन आले आहे, ज्यामध्ये मसूद अझहर पाकिस्तानात असल्याची पुष्टी करण्यात आली आहे. या वृत्तावर परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल म्हणाले की, आम्ही त्याच्यावर कठोर कारवाई करून त्याला योग्य ती शिक्षा मिळावी अशी मागणी करत आहोत. मात्र पाकिस्तान अजहरची आपल्या देशात उपस्थिती नाकारत आहे. मसूद अझहरचा भारतात अनेक सीमेपलीकडील हल्ल्यांमध्ये सहभाग आहे.