महाराष्ट्रात महायुतीची सत्तास्थापना झाल्यानंतर आता विधानसभेचे कामकाज सुरु झाले आहे. सध्या मुंबईत राज्याचे विशेष तीन दिवसीय अधिवेशन सुरु आहे. शनिवारी ७ डिसेंबर आणि रविवारी ८ डिसेंबर असे दोन दिवस सत्ताधारी आणि विरोधक आमदारांचा शपथविधी पार पडला. यानंतर आज विशेष अधिवेशनाचा तिसरा आणि शेवटचा दिवस आहे. आज विधानसभा अध्यक्षांची निवड करण्यात आली असून भाजप नेते आणि आमदार राहुल नार्वेकर यांची पुन्हा एकदा विधानसभा अध्यक्षपदी एकमताने निवड करण्यात आली आहे.
महाविकास आघाडीकडून एकाही उमेदवाराने अर्ज दाखल केला नाही. त्यामुळे राहुल नार्वेकर यांची आज एकमताने विधानसभेच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभा अध्यक्ष म्हणुन राहूल नार्वेकर यांची निवड करावी, यासाठी प्रस्ताव सभागृहात मांडला. यानंतर अनिल पाटील यांनी अनुमोदन दिले. त्यानंतर राहुल नार्वेकर यांची आवाजी मतदानाने एकमताने विधानसभा अध्यक्षपदी निवड झाली.
सर्वोच्च न्यायालयाने मूळ शिवसेना आणि राष्ट्रवादीवरील दावेदारीचा निर्णय घेण्याची जबाबदारी विधानसभा अध्यक्षांकडे दिली होती. त्यानंतर नार्वेकरांनी दोन्ही खटल्यात प्रत्यक्ष सुनावणी घेत निकाल सुनावला होता यानंतर आता पुन्हा एकदा राहुल नार्वेकर यांच्याकडे विधानसभेचे अध्यक्षपद जाणार आहे. यामुळे विधानसभेच्या अध्यक्षपदी सलग दुसऱ्यांदा शपथ घेणारे महाराष्ट्रातील पहिले तसेच सर्वात कमी वयाचे विधानसभा अध्यक्ष म्हणून त्यांची नोंद झाली आहे.
“नार्वेकर यांचे फेरनिवड झाली त्याबद्दल अभिनंदन. विरोधी पक्षांचे आभार मानतो. काही अपवाद वगळता बिनविरोध निवडणूक झाली,अध्यक्ष तुम्ही म्हटला नव्हता मी पुन्हा येईल पण तरी पुन्हा आलात”. असे मिश्कीलपणे म्हणत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राहुल नार्वेकर यांचे अभिनंदन केले आहे.
आता विरोधी पक्षनेतेपद कोणाला मिळणार याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष असणार आहे. कारण विरोधी पक्षनेतेपदासाठी लागणारे संख्याबळ कोणत्याही पक्षाकडे नाहीये.त्यामुळे विरोधी पक्षनेतेपद कुणाला द्यावं याचा निर्णय सरकार आणि विधानसभा अध्यक्ष घेणार आहे.