महिलांना स्वावलंबी बनवण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आज हरियाणातील पानिपत शहरातून मोठी घोषणा करणार आहेत. पंतप्रधान मोदी पानिपतमध्ये विमा सखी योजनेचा शुभारंभ करणार असून या योजनेचे उद्दिष्ट महिलांचे सक्षमीकरण आणि आर्थिक समावेशकता वाढवणे हा आहे. ही योजना भारतीय आयुर्विमा महामंडळ (LIC) चा उपक्रम आहे. या माध्यमातून 10वी उत्तीर्ण झालेल्या 18 ते 70 वयोगटातील महिलांचे सक्षमीकरण अधिक बळकट होणार आहे.
या योजनेंतर्गत महिलेला पहिल्या वर्षी 7,000 रुपये, दुसऱ्या वर्षी 6,000 रुपये आणि तिसऱ्या वर्षी 5,000 रुपये दरमहा पगार मिळेल. टार्गेट पूर्ण करणाऱ्या महिलेला 21,000 रुपयांपर्यंतचा नफा मिळेल. पानिपतच्या ऐतिहासिक भूमीवर होणाऱ्या कार्यक्रमाची सर्व तयारी पूर्ण झाली आहे. मुख्यमंत्री नायबसिंग सैनी म्हणाले आहेत की, विमा सखी योजनेतून महिला अधिक सक्षम होतील.
ते कॉँग्रेसवर टिका करत म्हणाले आहेत की, 2014 पूर्वी मुलींच्या गर्भातच हत्या होत असताना काँग्रेस सरकार झोपले होते. मात्र जेव्हा भाजपचे सरकार स्थापन झाले आणि नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान म्हणून मुलींना गर्भात मरू देणार नाही, अशी शपथ घेतली. तसेच 2015 मध्ये पानिपतच्या ऐतिहासिक भूमीतून बेटी बचाओ-बेटी पढाओची सुरुवात झाली आणि पंतप्रधानांच्या या आवाजाने बेटी बचाओ-बेटी पढाओ योजनेला संपूर्ण देशात जनआंदोलन बनवले. आज या योजनेच्या माध्यमातून महिलांनी आर्थिक स्वावलंबी व्हावे तसेच या योजनांमुळे महिलांच्या हातात पैसे राहावेत, यासाठी केंद्र सरकारकडून पुढाकार घेण्यात आला आहे.
दरम्यान, अंबाला येथील शेतकरी आंदोलनामुळे पोलिसांनी अंबाला, कुरुक्षेत्र, कर्नाल, पानिपत, सोनीपत आणि रोहतक जिल्ह्यांच्या सीमेवर कडक बंदोबस्त ठेवला आहे. पोलिस महासंचालक शत्रुजित कपूर सुरक्षा व्यवस्थेवर लक्ष ठेवून आहेत.
साडेतीन हजार पोलिस तैनात
एकीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी आज हरियाणात येत आहेत, तर दुसरीकडे शेतकऱ्यांनी पुन्हा दिल्लीकडे मोर्चाची घोषणा केली आहे, त्यामुळे हरियाणातील आठ जिल्ह्यांच्या सीमा सील करण्यात आल्या आहेत. पानिपतमध्ये अनेक ठिकाणी वाहतूक वळवण्यात आली असून सुमारे साडेतीन हजार पोलीस कर्मचारी आणि अधिकारी तैनात करण्यात आले आहेत. सुरक्षेचा भाग म्हणून प्रामुख्याने नाकाबंदी, मार्ग वळवणे तसेच अंडरपास बंद करण्यात आले आहेत.