इंटरनॅशनल सोसायटी फॉर कृष्णा चेतना (इस्कॉन) ने बांगलादेशात हिंदू समुदायाच्या नरसंहाराची भीती व्यक्त केली आहे. यासोबतच परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी बांगलादेशविरोधात कठोर कारवाई करण्याची मागणी संघटनेने भारताकडे केली आहे. बांगलादेशातील परिस्थिती नीट हाताळली गेली नाही तर तेथे मोठा नरसंहार होऊ शकतो, असा इशारा या संघटनेच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिला आहे.
इस्कॉन-कोलकाता उपाध्यक्ष आणि प्रवक्ते राधारमण दास यांनी रविवारी संध्याकाळी हे गंभीर विधान केले आहे. दास म्हणाले आहेत की, बांगलादेशातील कट्टरतावादी लोक इस्कॉनच्या अनुयायांविरुद्ध द्वेष पसरवण्याचे काम करत आहेत. त्यांनी सांगितले की अनेक व्हिडिओ समोर आले आहेत ज्यात कट्टरतावादी सामान्य लोकांना भडकवत आहेत आणि सांगत आहेत आहेत की “इस्कॉन हा एक कर्करोग आहे, तो फक्त कापून काढला जाऊ शकतो.
एक कट्टरतावादी नेता त्याच्या खासगी विमानातून बांगलादेशच्या विविध भागात जाऊन लोकांना भडकावत असल्याचेही दास यांनी सांगितले आहे. अशा कट्टरपंथीयांना रोखण्यात अपयश आल्यास बांगलादेशातील परिस्थिती आणखी बिघडू शकते, असेही ते म्हणाले. ते म्हणाले की, हे कट्टरपंथी सामान्य लोकांना नरसंहार करण्यासाठी प्रेरित करत आहेत. असे झाल्यास बांगलादेशचे लष्कर आणि पोलिसही परिस्थितीवर नियंत्रण ठेवू शकणार नाहीत.अशी भीती दास यांनी व्यक्त केली आहे.
यावेळी दास म्हणाले की, शनिवारी ढाका जिल्ह्यातील एका मंदिरात पेट्रोल टाकून जाळण्यात आले. या हल्ल्यात मंदिरातील मूर्तींचीही मोडतोड करण्यात आली. अशा घटना कट्टरवाद्यांच्या प्रक्षोभक वक्तव्याचा परिणाम असल्याचे ते म्हणाले आहेत. बांगलादेशातील या कट्टरपंथीयांना तात्काळ अटक करावी, अशी मागणी दास यांनी केली आहे. अश्या घटनांना त्वरित थांबवण्यात आले नाही तर बांगलादेश मोठ्या नरसंहाराकडे जाऊ शकतो, असे ते म्हणाले आहेत . बांगलादेशातील परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी भारत सरकारने त्वरेने पावले उचलावीत, असे त्यांनी विशेष आवाहन केले आहे.