कुर्ला येथे सोमवारी झालेल्या बेस्ट बसच्या अपघातातील मृत्युमुखींची संख्या वाढली आहे. या घटनेत आतापर्यंत ७ जणांचा मृत्यू झाला आहे. तर ४९ जण जखमी झाले आहेत. तर यातल्या २६ जणांची प्रकृती गंभीर आहे. भरधाव बेस्ट चालकाने अनेक वाहनांना धडक दिल्यानंतर हा भीषण अपघात झाला होता. दरम्यान पोलिसांनी चालक संजय मोरे याला अटक केली असून त्याच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याच्या चौकशीत अनेक धक्कादायक बाबी उघडकीस आल्या आहेत.
मोरे हा बेस्टमध्ये १ डिसेंबर रोजी चालक म्हणून भरती झाला होता. यापूर्वी तो दुसऱ्या ठिकाणी कामाला होता. पोलिसांनी त्याची चौकशी केली असता त्याला, या पूर्वी त्याने कुठलेही मोठे वाहन चालवले नसल्याचे पुढे आले आहे.तसेच अपघातग्रस्त इलेक्ट्रीक बस त्याने १० दिवसांपूर्वी चालवायला सुरवात केली होती. ही बस कशी चालवायची याचे ट्रेनिंग देखील त्याला नव्हते.अशी माहिती समोर आली आहे.आणि असे असताना त्याला बस चालवण्यास कशी दिली गेली याबाबत आता प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
तसेच दुसरीकडे संजय मोरे याची वैद्यकीय चाचणी झाली. त्यात त्याने मद्यप्राशन केले नसल्याचे समोर आले आहे . तसेच बसमध्येही कुठला बिघाड नसल्याचे समोर आले आहे. म्हणजेच अनुभव नसणे हे एकमेव कारण बस अपतातामागे दिसत आहे.
9 डिसेंबर 2024 रोजी बेस्टची बस 332 कुर्ला ते अंधेरी या मार्गाने जात होती. बसमध्ये 60 प्रवाशी होते. या बसमध्ये नेहमीच प्रवाशांची गर्दी असते. अचानक बस चालक संजय मोरे (54) याचे बसवरील नियंत्रण सुटले. यामुळे या बसने रस्त्यावर चालणाऱ्या पादचाऱ्यांना आणि अनेक वाहनांना घडक दिली. त्यानंतर थेट बस बुद्ध कॉलनी नावाच्या निवासी सोसायटीत घुसली आणि नंतर थांबली. या अपघातात गस्तीवर असलेले चार पोलीस आणि एमएसएफचे जवानही जखमी झाले आहेत. तसेच ४ नागरिकांचा जागीच मृत्यू झाला तर अनेकजण जखमी झाले .