कुर्ला पश्चिम परिसरामध्ये काल रात्री घडलेल्या एका भीषण अपघाताने मुंबई हादरली. यावेळी बेस्टच्या भरधाव इलेक्ट्रिक बसने अनेक वाहनांना धडक दिली. तसेच काही नागरिकांना देखील चिरडले .या अपघातात आतापर्यंत 7 जणांचा मृत्यू झाला आहे तर जवळपास ५० नागरिक जखमी झाले आहेत. या घटनेमुळे परिसरात मोठा गोंधळ उडाला आहे. दरम्यान पोलिसांनी आता संपूर्ण प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. बसचा आरोपी चालक संजय मोरे पोलिसांच्या ताब्यात असून त्याला न्यायालयात हजर करण्यात आले असून 21 डिसेंबरपर्यंत त्याला पोलीस कोठडी देण्यात आली आहे.
न्यायालयात युक्तिवाद वकिलांनी पोलीसांची बाजू मांडली. या वेळी वकिलांनी सोमवारी रात्री घडलेली सर्व घटना सांगितली. ही बस वातानुकूलित असून 332 या मार्गावर धावत होती. कुर्ला ते अंधेरी या मार्गावर ही बस जात होती. कुर्ला पश्चिम आंबेडकरनगर परिसरात हा भीषण अपघात झाला आहे.यामध्ये 22 गाड्यांचे नुकसान झाले आहे. अद्याप तपास करणे बाकी असून या घटनेचे अनेक प्रत्यक्षदर्शी साक्षीदार आहेत. दरम्यान अधिक तपासासाठी आरोपी संजय मोरेला सात दिवसाची पोलीस कोठडी द्यावी, अशी मागणी पोलिसांनी केली होती. दोन्ही बाजूंचा प्रत्यक्ष युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने आरोपीला 21 डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे