पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आज दोन महत्त्वाचे कार्यक्रम आहेत.पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते आज 11 डिसेंबर रोजी, नवी दिल्लीतील 7 लोक कल्याण मार्ग, येथे दुपारी 1 वाजता महान तमिळ कवी आणि स्वातंत्र्यसैनिक सुब्रमण्य भारती यांच्या संपूर्ण कार्यावरील संग्रहाचे प्रकाशन करण्यात येणार आहे.तसेच दुपारी 4:30 वाजता पंतप्रधान स्मार्ट इंडिया हॅकेथॉन 2024 च्या ग्रँड फिनालेमध्ये तरुण नवोन्मेषांबरोबर दूरदृश्य प्रणालीमार्फत संवाद साधणार आहेत. या ग्रँड फिनालेमध्ये 1300 हून अधिक विद्यार्थी संघ सहभागी होतील. पंतप्रधान या कार्यक्रमात उपस्थितांना संबोधित करणार आहेत.
भारत सरकारच्या प्रेस अँड इन्फॉर्मेशन ब्युरो (PIB) कडून जारी करण्यात आलेल्या पत्रकानुसार, देशभरातील 51 नोडल केंद्रांवर 1300 हून अधिक विद्यार्थ्यांचे संघ या महाअंतिम फेरीत सहभागी होतील. स्मार्ट इंडिया हॅकाथॉनची ही सातवी आवृत्ती आहे. या वेळच्या थीममध्ये इस्रोचे ‘चंद्रावरील गडद भागांच्या प्रतिमा वाढवणे’, जलशक्ती मंत्रालयाचे ‘एआय, सॅटेलाइट डेटा, आयओटी आणि डायनॅमिक मॉडेल्सचा वापर करून रिअल-टाइम गंगा जल गुणवत्ता निरीक्षण प्रणाली विकसित करणे’ आणि आयुष मंत्रालयाचे ‘स्मार्ट योग मॅट विकसित करणे’ यांचा समावेश आहे. AI’ च्या मदतीने हे तंत्रज्ञान विकसित करण्यात आले आहे.
तर सुब्रमण्यम भारती यांच्या लेखनाने लोकांमध्ये देशभक्ती जागृत केली आहे. त्यांनी भारतीय संस्कृती आणि देशाच्या आध्यात्मिक वारशाचे सार जनतेपर्यंत त्यांच्या भाषेत पोहोचवले आहे. सुब्रमण्यम भारती यांच्या संपूर्ण कामांची नोंद 23 खंडांच्या संचांमध्ये केलीआहे.हे खंड सीनी विश्वनाथन यांनी संकलित आणि संपादित केले आहेत तर अलायन्स पब्लिशर्सने ते प्रकाशित केले आहेत. या ग्रंथांमध्ये सुब्रमण्यम भारती यांच्या लेखनाच्या आवृत्त्या, स्पष्टीकरण, दस्तऐवज, पार्श्वभूमीची माहिती आणि तत्वज्ञानविषयक लिखाणाचे तपशील अंतर्भूत करण्यात आले आहेत.