सीरियातील बशर अल असद यांचे सरकार हयात तहरीर अल शाम या बंडखोर संघटनेने उलथवून लावल्यानंतर गोंधळ माजला आहे. सीरियातील सत्तेवर आता या बंडखोरांनी ताबा मिळवला आहे. अनेक ठिकाणी हिंसक हल्ले होत आहेत.सरकारी इमारती जाळल्या जात आहेत. लूटमार केली जात आहे. अचानक झालेल्या या उलथापालथीमुळे अनेक परदेशी नागरिक सीरियात अडकले आहेत. यामध्ये भारताने सीरियातून ७५ भारतीय नागरिकांना सुखरूप बाहेर आणण्याचे काम केले आहे. परराष्ट्र मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, सुरक्षा परिस्थितीची आढावा घेतल्यानंतर या ऑपरेशनचे समन्वय दमास्कस आणि बेरूतमधील भारतीय दूतावासांनी केले आहे.
भारताने मंगळवारी (१० डिसेंबर) सीरियात अडकलेल्या ७५ नागरिकांना सुरक्षितपणे बाहेर काढले आहे.सीरियातून बाहेर काढण्यात आलेल्या भारतीयामध्ये जम्मू-काश्मीरमधील ४४ यात्रेकरूंचा समावेश आहे.हे सैय्यदा जैनब (सीरियातील शिया मुस्लिमांचे एक धार्मिक स्थळ) येथे अडकले होते. सर्व भारतीय नागरिकांना सीरियातून बाहेर काढल्यानंतर सुरक्षितपणे लेबनॉनला पोहोचले आहेत. त्यानंतर विमानातून त्यांना भारतात आणले जाणार आहे.विशेष म्हणजे हयात तहरीर अल शामच्या बंडखोरांनी बशर अल असाद यांच्या सरकार हटवल्याच्या दोन दिवसांनी ही गोष्ट घडली आहे.
परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने सांगितले की, भारतीय नागरिकांच्या सुरक्षिततेबद्दलचा संभाव्य धोका लक्षात घेऊन त्यांना देशातून बाहेर काढण्याचे काम दमास्कस आणि बैरूतमधील भारतीय उच्चायुक्तालयातून करण्यात आले आहे . तसेच सरकार परदेशात भारतीय नागरिकांच्या सुरक्षेला प्राधान्य देते. परराष्ट्र मंत्रालयाने सीरियात राहणाऱ्या भारतीय नागरिकांना दमास्कसमधील भारतीय दूतावासाच्या संपर्कात राहण्याचा सल्ला दिला आहे. सरकार परिस्थितीवर बारीक लक्ष ठेवणार आहे.असेही परराष्ट्र मंत्रालयाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.