नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत महायुतीला तब्बल 237 जागांवर यश मिळाले आहे. तर महाविकास आघाडीला अवघ्या 50 पर्यंतचा आकडाही गाठता आला नाही. तसेच मविआतील तीनही प्रमुख घटक पक्षांना 29 चा देखील आकडा गाठता आलेला नाही. त्यामुळे तीनही पक्षांपैकी एकही पक्ष विरोधी पक्षनेता पदासाठी पात्र ठरलेला नाही. त्यामुळे राज्यात विरोधी पक्षनेता पद असेल का नाही अशा शंका व्यक्त होत आहे. दरम्यान हिवाळी अधिवेशन अवघ्या चार दिवसांवर येऊन ठेपले आहे. अशात मविआकडून अद्याप विरोधी पक्षनेते पदासाठी अर्ज दाखल झाला नसल्याची माहिती मिळत आहे. असे असले तरी विरोधी पक्षनेते पदासाठी विरोधकांकडून अर्ज आल्यानंतर विचार केला जाणार असल्याची माहिती विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिली आहे.
विरोधी पक्षनेतेपदासाठी विरोधकांकडे आवश्यक संख्याबळ नाही. त्यामुळे विधानसभा अध्यक्ष हेच विरोधी पक्षनेतेपदाचा निर्णय घेतील, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी याआधीच स्पष्ट केले होते. मात्र विरोधी पक्षनेते पदाबाबत मविआच्या गोटात अजूनही एकमत होताना दिसत नसून रस्सीखेच सुरू असल्याचे समजते.
दरम्यान, राज्याची उपराजधानी असलेल्या नागपुरात येत्या 16 ते 21 डिसेंबर रोजी हिवाळी अधिवेशन होणार आहे. नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात नवनिर्वाचित 288 आमदारांना प्रथमच डिजिटल आसन व्यवस्था मिळणार आहे. तर अधिवेशनाच्या अनुषंगाने विधान भवन परिसरातील तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. विशेष म्हणजे 78 नवीन आमदार असून ते पहिल्यांदाच विधानसभेत येणार आहे. त्यात भाजपचे 33, शिंदे गट शिवसेना 14, अजित पवार गट राष्ट्रवादी 8, ठाकरे शिवसेना 10, कांग्रेस 6, शरद पवार गट राष्ट्रवादी 4 व इतर 3 आमदारांचा समावेश आहे.
अशातच मुंबईतील विशेष अधिवेशनात शिवसेना पक्षप्रमुख आणि विधान परिषद आमदार उद्धव ठाकरे अनुपस्थित राहिले होते. मात्र नवीन सरकारच्या नागपूर येथील पहिल्या अधिवेशनाला ठाकरे उपस्थित राहतील, अशी माहिती मिळत आहे. रविवार, 15 डिसेंबर रोजी ते मुंबईतून नागपुरला येतील. तसेच कामकाजातही सहभागी होणार आहेत.